सेलू महसूल विभागाच्या कारवाईने वाळू माफियांत खळबळ
सेलू : अवैध गौण खनिज उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने आता आक्रमक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. सेलूचे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने शुक्रवारी, २ जानेवारी रोजी रात्री मोरेगाव (ता. सेलू) शिवारात धाडसी कारवाई केली. या मोहिमेत अवैध वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले असून, या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ माजली आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मोरेगाव परिसरात रात्रीच्या सुमारास गौण खनिजाची अवैध वाहतूक होणार होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी तातडीने एक विशेष पथक तयार केले. शुक्रवारी रात्री उशिरा हे पथक मोरेगाव परिसरात गस्तीवर असताना त्यांना संशयास्पद वाहने दिसून आली. महसूल विभागाच्या पथकाची चाहूल लागताच चालकांनी वाहने पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने पाठलाग करून तीन ट्रॅक्टर पकडण्यात यश मिळवले. या महत्त्वपूर्ण कारवाईत उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांच्यासोबत ग्राम महसूल अधिकारी ओम कानडे, दीपक गांगुर्डे, महेश डंबाळे आणि संतोष काळे यांचा समावेश होता. जप्त केलेले ट्रॅक्टर सध्या प्रशासकीय ताब्यात असून, संबंधित वाहन मालक आणि चालकांविरुद्ध कडक दंडात्मक कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे.
तालुक्यातील नदीपात्रातून किंवा इतर ठिकाणाहून विनापरवाना गौण खनिजाचे उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध ही मोहीम यापुढेही अशीच सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी होणाऱ्या चोरीच्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष गस्ती पथके तैनात करण्यात आली आहेत.





