उद्या जाहीर होणार निकाल, १५०८ पैकी १४८१ मतदारांनी बजावला हक्क
परभणी : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या आठ जागांकरिता आज रविवार, १९ जुलै २०२६ रोजी ९८.२१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विविध मतदारसंघांतील एकूण १५०८ मतदारांपैकी १४८१ (९८.२१) मतदारांनी मतदानात सहभाग नोंदविला आहे. निकाल सोमवारी, २० जुलै रोजी जाहीर होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सु.पं.काकडे यांनी ही माहिती दिली.
परभणी व हिंगोली या दोन जिल्ह्यातील ज्येष्ठ मातब्बर नेतेमंडळीसह, अन्य आजी-माजी खासदार, आमदार तसेच ज्येष्ठ संचालकांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी मतदानात सहभाग नोंदविला. दरम्यान, परभणी जिल्ह्यातील मानवत व पूर्णा, हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, या पाच सोसायटी मतदारसंघासह अन्य तीन जागांकरिता या निवडणुकीचा मतदानाचा टप्पा पार पडला.






