“हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” अभियान
सेलू : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी “हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” अभियानांतर्गत सुरू असलेल्या १० कोटी वृक्ष लागवड मोहीम २०२५ मध्ये सेलू येथील अपूर्वा तंत्रनिकेतन महाविद्यालयाने उत्साहात आणि सक्रियपणे सहभाग नोंदवला. पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने महाविद्यालयाने या उपक्रमात पुढाकार घेतला.
श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम राबवण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व विभागप्रमुख, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. २८ जुलै रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात विविध प्रकारच्या देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी, “एक विद्यार्थी, एक वृक्ष” या संकल्पनेला अनुसरून प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतः एक झाड लावून त्याच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. या उपक्रमामागे विद्यार्थ्यांमध्ये आणि महाविद्यालयीन कुटुंबात पर्यावरण संवर्धनाचे भान निर्माण करणे हा मुख्य उद्देश होता. महाराष्ट्र शासनाच्या वन विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध शैक्षणिक संस्थांच्या संयुक्त सहकार्याने ही मोहीम राबविण्यात येत असून, अपूर्वा तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे यातील योगदान अत्यंत प्रशंसनीय ठरले आहे. या सहभागामुळे पर्यावरणाच्या रक्षणासाठी सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.





