दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल
सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी) तालुक्यातील रायपूर येथील हताश झालेल्या शेतकऱ्यांनी अखेर उभ्या सोयाबीनच्या शेतात शेळ्या चरण्यासाठी सोडून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
वालूर, चिकलठाणा महसूल मंडळासह संपूर्ण सेलू तालुक्यात अर्धा पावसाळा उलटून गेला तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. मागील दीड महिन्यापासून पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे तालुक्यातील खरीप पिके धोक्यात आली आहेत. सोयाबीन, कापूस, मूग आणि तूर या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी गंभीर संकटात सापडले आहेत.या परिस्थितीची दखल घेऊन सेलू तालुक्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करावा आणि पीक विमा कंपन्यांना आदेश देऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर २५ टक्के अग्रिम रक्कम तातडीने जमा करावी, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या निवेदनावर रामेश्वर विठ्ठलराव गोडेकर, बाबासाहेब गोडेकर, राजेश राऊत, दादासाहेब गोडेकर, किसनराव गोडेकर, योगेश काकडे, सतीश काकडे यांच्यासह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
रायपूर शिवारात सुमारे ३२०० एकर क्षेत्र लागवडीखाली असून त्यापैकी सोयाबीनच्या जवळपास अर्ध्या क्षेत्रावर शेळ्या आणि जनावरे चरण्यासाठी सोडण्यात आली आहेत. आणखी दोन दिवस पावसाची वाट पाहून सर्वच क्षेत्रावर जनावरे सोडण्याच्या विचारात शेतकरी आहेत. ही सर्व गंभीर परिस्थिती पाहता सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी. अन्यथा मोरेगाव पाटी येथील राष्ट्रीय महामार्गावर ५४८ (बी) रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. – रामेश्वर विठ्ठलराव गोडेकर, शेतकरी रायपूर ता.सेलू




