सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम
सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’ (महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियान) अभियानातील ग्रामसखींच्या हस्ते ध्वजारोहणाचा उपक्रम राबविण्यात आला. ग्रामीण महिलांच्या नेतृत्वाचा सन्मान करणार्या या उपक्रमामुळे ग्रामसखींसह महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
सेलू तालुक्यात एका प्रशासकाकडे एकापेक्षा अधिक ग्रामपंचायतींचा कार्यभार असल्याने सर्व ग्रामपंचायतींमध्ये एकाच वेळी प्रशासकांची प्रत्यक्ष उपस्थिती शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर, ज्या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत, तेथे ‘उमेद’ अभियानातील ग्रामसखींना ध्वजारोहणाचा मान देण्यात आला.
या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक महिलांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला.
निपाणी टाकळी येथे ग्रामसखी उषा दत्ता ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी बोलताना त्यांनी मुक्तीसंग्रामाचे महत्त्व सांगून, तालुक्यातील ४९ ग्रामसखींना ध्वजारोहणाचा सन्मान दिल्याबद्दल पालकमंत्री मेघना बोर्डीकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, सभापती विजयमाला डोंबे, गटविकास अधिकारी उदय जाधव, तसेच उमेदच्या सीता पाटील यांचे विशेष आभार मानले.
झोडगाव येथे महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रभात फेरी काढली होती. ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचे संघटन, आर्थिक स्वावलंबन आणि स्थानिक नेतृत्व विकासासाठी ग्रामसखी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत ध्वजारोहणाचा मान देण्यात आल्याने ग्रामीण महिलांना सार्वजनिक जीवनातील नेतृत्वाची संधी आणि सन्मान मिळाल्याची भावना अनेक महिलांनी व्यक्त केली आहे.





