पालममध्ये १५३, तर राणी सावरगावमध्ये १४३ मिमी पाऊस, नदी,नाले, ओढ्यांना पूर
परभणी : परभणी जिल्ह्यातील २० महसूल मंडळात शनिवारी, २७ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सकाळी पावणे अकराच्या अहवालानुसार, काही मंडळांमध्ये पावसाने शंभरीचा आकडा पार केला आहे. यामुळे नदी, नाले, ओढे, तुडुंब भरून वाहत आहेत. जनजीवन ठप्प झाले आहे. सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे.
मागील पाच सहा दिवसांपासून परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी आणि संततधार पावसामुळे संपूर्ण खरीप पिके उद्ध्वस्त झाली आहेत. प्रचंड नुकसानीमुळे शेतकऱ्यांमध्ये त्राणच उरले नाहीत. बाधित शेतकऱ्यांना तत्काळ मदतीची मागणी विविध पक्षसंघटनांकडून केली जात आहे.
पालम, गंगाखेड तालुक्यात सर्वाधिक पाऊस
शनिवारी सकाळी पावणे अकरा वाजेपर्यंत पालम, गंगाखेड तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. राणीसावरगाव मंडळात तब्बल १४३ मिमी पावसाची विक्रमी नोंद झाली, तर पिंपळदरी येथे १११.३ मिमी, गंगाखेड येथे १०६.३ मिमी, महादपुरी येथे ९१.५ मिमी आणि माखणी येथे ८२.३ मिमी पाऊस झाला. पालम तालुक्यातही पालम येथे १५३.३ मिमी, चाटोरी येथे १४३ मिमी आणि बनवस येथे १३९.८ मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय, पेट शिवनी येथे १११.५ मिमी आणि रावराजुर येथे ११३.० मिमी पाऊस झाला. पूर्णा तालुक्यात जोरदार पाऊस झाला. कावलगाव येथे ९९.८ मिमी पाऊस झाला, तर ताडकळस येथे ९७.८ मिमी, चुडावा येथे ८५.८ मिमी, लिमला येथे ७७ मिमी, पूर्णा येथे ७५ मिमी आणि कातनेश्वर येथे ६७.५ मिमी पावसाची नोंद झाली.
परभणी आणि सोनपेठ तालुक्यातही जोरदार हजेरी लावली असून परभणी तालुक्यात दैठणा येथे ७९.० मिमी, तर पिंगळी आणि परभणी ग्रामीण येथे प्रत्येकी ६५.८ मिमी पावसाची नोंद झाली. सोनपेठ तालुक्यात वडगाव येथे ७६.८ मिमी आणि आवलगाव येथे ६५.८ मिमी पाऊस झाला आहे. परभणी जिल्ह्यातील अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. शनिवारी सकाळी पावणे अकरापर्यंत परभणी जिल्ह्यात सरासरी ५८.१ मिलिमीटर पाऊस झाला. मागील चोवीस तासांत तालुकानिहाय झालेला सरासरी पाऊस मिलिमीटरमध्ये : परभणी ४६.६, गंगाखेड १०६.८, पाथरी ३७.६, जिंतूर २३.७, पूर्णा ८३.८, पालम १३२.१, सेलू २६.६, सोनपेठ ५५.८, मानवत ३६.१
गंगाखेड, पूर्णा, पालम या तीनही तालुक्यांमध्ये पूरस्थिती गंभीर आहे. पूरस्थितीवर नियंत्रणासाठी संपूर्ण प्रशासन यंत्रणा सज्ज आहे. गळाटी नदीला आलेल्या पुरामुळे गंगाखेड पालम तसेच गंगाखेड राणीसावरगाव रस्ता बंद झालेला आहे. चुडावा हद्दीत पूर्णा ते नांदेड रोडवर मौजे चुडावा गावाजवळ पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद केलेली आहे. योग्य बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. सेलू – वालूर रस्ता राजवाडी येथील दुधना नदी पुलावरून पाणी वाहत असल्याने बंद आहे.





