भंते अनालायो यांचे प्रतिपादन
परभणी : तथागत गौतम बुद्धांचा धम्म हा नैतिकता शिकवणारा आणि समृद्धी देणारा असल्याने तो संपूर्ण विश्वाच्या कल्याणाचा महामार्ग आहे, असे प्रतिपादन थायलंड येथील भंते अनालायो यांनी केले. भारत भूमीला तथागत बुद्धांची भूमी मानून संपूर्ण जगातील बौद्ध उपासक श्रद्धेने पाहतात आणि वंदन करतात, असे ते म्हणाले.
आश्रय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष धम्मदूत डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांच्या आयोजनातून मांडाखळी येथील नियोजित बुद्ध विहाराच्या १० एकर जागेत अश्विन पौर्णिमेनिमित्त सोमवारी (दि. ०६ ऑक्टोबर) थायलंड येथील भिक्खू संघाची धम्मदेशना व परित्राण पाठ कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी संजय चव्हाण आणि पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात भिक्खू संघाच्या हस्ते ५० फूट उंच धम्म ध्वजाच्या ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर तथागत भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जिल्हाधिकारी संजय चव्हाण आणि भिक्खू संघाच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी विविध गावांतील उपासकांनी भिक्खू संघाला चिवरदान केले. आयोजक डॉ. हत्तीअंबीरे यांनी भिक्खू संघाचे व मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी भंते डॉ. उपगुप्त महाथेरो, भंते पयाबोधी, भंते मोगलायन यांच्यासह थायलंड येथील भिक्खू संघाची धम्मदेशना संपन्न झाली.
प्रास्ताविक करताना डॉ. हत्तीअंबीरे म्हणाले की, मांडाखळी परिसरात लवकरच बुद्ध विहाराची भव्य निर्मिती होणार आहे. विदेशातील भिक्खू संघाला आमंत्रित करून तथागतांच्या धम्माचा पवित्र विचार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला संदेश तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे.
जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी यावेळी बोलताना बौद्ध धम्माचे विचार हे समस्त मानवांच्या कल्याणाचे असून, प्रत्येक व्यक्तीने ते आत्मसात करून आपले जीवन समृद्ध करावे, असे मत व्यक्त केले. मांडाखळीसारख्या ग्रामीण भागात स्वखर्चातून जागा घेऊन डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबीरे हे बुद्ध विहार उभे करत आहेत, हे अतिशय सुंदर कार्य असून, त्यांनी हत्तीअंबिरे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल वाहिवळ यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रकाश हातागळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक बौद्ध बांधवांनी परिश्रम घेतले.





