माजी महासंचालक डॉ. मंगला राय यांचे विद्यार्थ्यांना आवाहन, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा २७ वा दीक्षांत समारंभ उत्साहात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि श्रीरंग उर्फ दादा देवबा लाड डॉक्टर ऑफ सायन्स मानद पदवीने सन्मानित

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा (वनामकृवि) २७ वा दीक्षांत समारंभ ११ डिसेंबर २०२५ रोजी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात उत्साहात संपन्न झाला. भारतीय कृषि संशोधन परिषदेचे माजी महासंचालक डॉ. मंगला राय यांनी दीक्षांत अभिभाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग वैयक्तिक, कौटुंबिक आणि राष्ट्रीय विकासासाठी करावा. सामर्थ्य निर्माण करणारी कृती सतत ठेवावी आणि मानवी मूल्यांची जपणूक करावी.” त्यांनी भारतीय कृषीच्या बदलत्या दिशा आणि अचूक शेती, कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) सारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे मिळणाऱ्या भविष्यातील संधींवर विशेष भर दिला.
या समारंभाचे अध्यक्षस्थान कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले. या समारंभात कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रगतीशील शेतकरी श्रीरंग उर्फ दादा देवबा लाड यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (मानद) पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. तसेच, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील एकूण २,९६८ स्नातकांना विविध पदव्या प्रदान करण्यात आल्या. यात आचार्य पदवीचे ४४, पदव्युत्तर पदवीचे ३३३ आणि पदवी अभ्यासक्रमाचे २,५९१ स्नातकांचा समावेश आहे.
व्यासपीठावर कुलगुरू डॉ. शरद गडाख, कुलगुरू डॉ. विलास खर्चे, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, मनापा आयुक्त नितीन नार्वेकर, प्रगतीशील शेतकरी श्रीरंग देवबा लाड, यांच्यासह वनामकृविचे माजी कुलगुरू डॉ. वेदप्रकाश पाटील, डॉ. के.पी. गोरे, डॉ. अशोक ढवण, कृषि परिषदेचे सदस्य जनार्धन कातकडे, विद्यापीठाचे कुलसचिव संतोष वेणीकर, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, नियंत्रक अनंत कदम, विद्यापीठ अभियंता दीपक कशाळकर, उपजिल्हाधिकारी उदय भोसले, विद्यापीठाचे माजी संचालक डॉ. पी. आर. शिवपूजे, धर्मराज गोखले, डॉ. मोरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील कृषी व हवामानाच्या गरजांनुसार १९६८ ते १९७२ या कालावधीत चार स्वतंत्र कृषि विद्यापीठांची स्थापना झाली. परभणी येथील विद्यापीठाची स्थापना १८ मे १९७२ रोजी झाली असून, गेल्या पाच दशकांत विद्यापीठाने उल्लेखनीय प्रगती साधली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण–२०२० नुसार अभ्यासक्रमातील बदल, उत्कृष्ट संशोधन व तंत्रज्ञान हस्तांतरण, शिक्षणातील मूल्याधिष्ठित दृष्टिकोन, कृषी विकासासाठी ‘गुंतवणूक आणि अधिक गुंतवणूक’ ही मूलभूत गरज, कृषी व शेतकरी विकासासाठी एकात्मिक आणि आधुनिक कृषि प्रणालींची निर्मिती, प्रदेशनिहाय शाश्वत उत्पादन प्रणालींची उभारणी, माती–पाणी–जैवविविधता संवर्धन, पिकसंरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी, इनपुट–आउटपुट आधारित कृषी मॉडेल्स आणि बहुआयामी अॅग्रो-इकोसिस्टमची निर्मिती — हे मुद्दे त्यांनी विशेषत्वाने अधोरेखित केले.
विद्या, धन आणि शक्ती यांचा योग्य वापर करावा : कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दीक्षांत समारंभास महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांचे माननीय राज्यपाल तथा विद्यापीठाचे माननीय कुलपती श्री आचार्य देवव्रत आणि माननीय कृषि मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा. ना. श्री. दत्तात्रय भरणे यांनी पाठविलेल्या शुभेच्छांचा उल्लेख केला. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि प्रगतशील शेतकरी श्री. श्रीरंग उर्फ दादा लाड यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (मानद) पदवीने सन्मानित करण्यात आल्याबद्दल आनंद व्यक्त करून त्यांचे अभिनंदन केले. तसेच माननीय मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार प्रयोगशील शेतकऱ्यांना ‘शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आल्याबद्दलही समाधान व्यक्त केले. हा पुरस्कार केवळ एका शेतकऱ्याचा नसून संपूर्ण शेतीव्यवस्थेचा आणि शेतीत कार्य करणाऱ्या सर्वांचा सन्मान आहे. विद्यापीठ ‘शेतकरी देवो भव:’ या भावनेतून कार्यरत आहे. यासोबतच विद्यापीठ विद्यार्थी-केंद्रित शिक्षण, नाविन्यपूर्ण संशोधन, शेतकरी-केंद्रित विस्तारकार्य आणि कर्मचारी-केंद्रित प्रशासन या तत्त्वांवर कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या सर्व विभागांनी या कार्यात मनापासून योगदान दिले आहे. जुन्या आणि नवीन अशा विविध महाविद्यालयांच्या स्थापनेतून विद्यापीठाने एकूण एक लाख एकोणतीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी (१२९२८४) कृषीचे शिक्षण दिले असून शेतीसाठी सक्षम व प्रभावी मनुष्यबळ तयार केले आहे.
विद्यापीठाचे संशोधन जोखीम व्यवस्थापन, उत्पादनवाढ आणि आधुनिक तंत्रज्ञान पुरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कापूस, सोयाबीन आणि तूर या पिकांमध्ये विद्यापीठाने मोठे योगदान दिले आहे. काही शेतकऱ्यांचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी येत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आणि संशोधकांनी यावर संशोधनाची दिशा ठरवून अधिक कार्य करावे, असे आवाहन केले. शेतीसाठी विद्वत्तेबरोबरच प्रत्येक पिकासाठी लागवडीची वैज्ञानिक मानके ठरविण्याची आवश्यकता आहे. उत्पादन खर्चात बचत करून सकस, गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळावे यासाठी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय राज्यपाल श्री आचार्य देवव्रत हे नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला विशेष प्रोत्साहन देत आहेत. या कार्यात विद्यापीठ सक्रियतेने सहभागी होत असून ‘बायोमिक्स’ आणि इतर सेंद्रिय घटकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात करून त्यांचे वितरण जिल्हास्तरीय केंद्रांद्वारे केले जात आहे. संशोधनासाठी आधीच्या प्रकल्पांबरोबरच सिरसाद्वारे नवे प्रकल्प उभारले जात असून, त्यातून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे.
विद्यापीठाने अनेक क्षेत्रांत क्रांतिकारी कामगिरी केली असून भारतीय कृषी अनुसंधान परिषदेद्वारे अधिस्वीकृतीचा ‘अ’ दर्जा प्राप्त केला आहे आणि अनेक गौरव मिळवले आहेत. विद्यापीठाच्या विकासासाठी जिल्ह्यातील विविध यंत्रणांचे सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी श्री संजयसिंह चव्हाण आणि आयुक्त श्री नितीन नार्वेकर यांची उपस्थिती हे त्याचे उत्तम उदाहरण असल्याचेही त्यांनी नमूद केले.
विस्तारकार्याच्या संदर्भात त्यांनी सांगितले की, प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत’ आणि आठवड्यातून दोन वेळा ‘ऑनलाइन शेतकरी–शास्त्रज्ञ संवाद’ आयोजित केला जातो. यामुळे शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडत आहे आणि त्यामुळे विद्यापीठाच्या कुलगुरूंना ‘शेतकऱ्यांचे कुलगुरू’ असे संबोधले जाते. विद्यार्थ्यांना संदेश देताना त्यांनी सांगितले की, शिक्षण घेऊन केवळ नोकरीच्या मागे न लागता उद्योजकतेकडे वळावे. विद्या घेऊन चारित्र्य जपावे, चारित्र्यातून विनम्रता यावी, विनम्रतेतून पात्रता निर्माण व्हावी आणि पात्रतेतून धन व समाधान मिळते. विद्या, धन आणि शक्ती यांचा योग्य वापर करावा. तसेच नीतीमूल्ये जपून दुसऱ्यांच्या अडचणी व व्यथा समजून घ्याव्यात, इतरांचेही भले होईल असा दृष्टिकोन ठेवावा. आपल्या इच्छा-अपेक्षा सजगतेने ठरवून त्यासाठी कठोर परिश्रम करावेत, असेही त्यांनी सांगितले.
समारंभाच्या स्वागतपर भाषणात शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून विद्यापीठाच्या प्रगती आणि कार्याची माहिती सांगितली. दीक्षांत समारंभात महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शेती व शेतकरी विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले व धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. स्मार्ट प्रोजेक्ट आणि पोक्रा तसेच महाराष्ट्र कृषी एआय धोरणामुळे महाराष्ट्र आज भारतातील कृषी क्षेत्रातील ‘लाइट हाऊस स्टेट’ म्हणून उदयास येत आहे. दूरदर्शी नेतृत्वाखाली महाराष्ट्र हे ‘महाॲग्री एआय पॉलिसी २०२५–२०२९’ जाहीर करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे.याबरोबरच जलयुक्त शिवार अभियान, शेतीमालाला हमीभाव व बाजारपेठ उपलब्ध करून देणे, पायाभूत सुविधा व सिंचन प्रकल्पांचा विस्तार, पाणी संवर्धन, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार, शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत, अन्नप्रक्रिया व मूल्यसाखळी विकास, बाजार सुधारणा तसेच डिजिटल शेती यांसारख्या उपक्रमांद्वारे त्यांनी राज्यातील शेती क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणले. ग्रामीण विकासातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाच्या दृष्टीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ त्यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (मानद) पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
तसेच परभणी जिल्ह्यातील माळसोन्ना येथील प्रगतीशील शेतकरी आणि ज्येष्ठ कार्यकर्ते माननीय श्री. श्रीरंग देवबा लाड यांचीही या ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (मानद) पदवीसाठी निवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांशी त्यांचा सातत्यपूर्ण आणि घनिष्ठ संपर्क तसेच राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त “दादा लाड कापूस तंत्रज्ञान” हे त्यांचे सर्वात मोठे योगदान मानले जाते. सन 2002–03 पासून शेतकरी-आधारित संशोधनातून त्यांनी कापूस पिकातील उत्पादकता घटवणाऱ्या गळफांदी (मोनोपोडियल) फांद्यांचा सखोल अभ्यास करून त्यांच्या प्रारंभीक छाटणीची प्रभावी पद्धत विकसित केली. शेंडा खुडणी, अती घन लागवड, ठिबक सिंचन आणि आच्छादन या तंत्रांचा एकत्रित अवलंब करून त्यांनी कापूस पिकासाठी समग्र, वैज्ञानिक आणि नफावर्धक तंत्रज्ञान विकसित केले. या पद्धतीमुळे उत्पादक फांद्यांकडे अन्नद्रव्यांचा पुरवठा वाढतो, बोंडांचे वजन जास्त होते, किडींचा प्रादुर्भाव कमी होतो, पीक कालावधी कमी होतो आणि शेतकऱ्यांचा नफा मोठ्या प्रमाणात वाढतो. तसेच चार दशकांहून अधिक काळ लाल कांधारी या देशी गायीच्या जातीच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी त्यांनी उल्लेखनीय आणि व्यापक कार्य केले आहे. या महत्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन विद्यापीठ त्यांना मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (मानद) पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
दीक्षांत समारंभात सन २०२४- २५ या शैक्षणिक वर्षातील विविध विद्याशाखेतील विविध पदवी, पदव्युत्तर पदवी व आचार्य पदवी पूर्ण करणाऱ्या एकुण २९६८ स्नातकांना पदवी अनुग्रहीत करण्यात आले. यात आचार्य पदवीचे ४४ पात्र स्नातक, पदव्युत्तर पदवीचे ३३३ स्नातक व पदवी अभ्यासक्रमाचे २५९१ स्नातकांचा समावेश आहे. याबरोबरच दीक्षांत समारंभात सन २०२४ – २५ या शैक्षणिक वर्षातील विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाने व दात्यांनी निश्चित केलेल्यां सूवर्ण पदके, रौप्य पदके व रोख पारितोषिके पात्र स्नातकांना प्रदान करून मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात येणार आहे. एकूण ६३ पदके आणि प्रमाणपत्रे वितरण करण्यात येणार आहेत. यामध्ये १४ विद्यापीठ सुवर्ण पदके, दात्यांकडून देण्यात येणारे ११ सुवर्ण पदके, १ रौप्य पदक आणि १२ रोख पारितोषिकांचे वितरण करण्यात आले असुन यात २५ पदव्युत्तर पदवी गुणवत्ता प्रमाणपत्रांचा समावेश आहे.
पीएच.डी. पदवी प्रमाणपत्रे, पदके, प्रमाणपत्रे दीक्षांत समारंभास उपस्थित असलेल्या पदवीधारकांना देण्यात आली व उर्वरीत स्नातकांना याच दिवशी त्यांच्या संबंधीत महाविद्यालयात व विभागात पदवी प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली.
याबरोबरच, माननीय मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विद्यापीठात नुकत्याच पार पडलेल्या संयुक्त कृषि संशोधन परिषदेमध्ये प्रयोगशील आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कार’ देण्याची सूचना केली होती. त्यांच्या सूचनेनुसार विद्यापीठाने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतून निवड समितीच्या अहवालानुसार सर्वसाधारण गटातील नऊ आणि महिला गटातील दोन अशा एकूण आकारा शेतकऱ्यांची निवड करून त्यांना दीक्षांत समारंभात ‘शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
यावर्षी दीक्षांत समारंभास विद्या वस्त्रामध्ये सकारात्मक बदल करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी व अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक वृंद यांनी पांढरा कुर्ता-पायजमा व विद्यार्थिनींनी तसेच महिला अधिकारी, कर्मचारी यांनी क्रीम कलरची साडी व ब्लाउज परिधान केले. हा सकारात्मक बदल यापूर्वी राष्टीय पातळीवर अनेक विद्यापीठाने लागू केला असून या विद्यापीठाने देखील यावर्षी स्वीकारला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव आणि डॉ. रणजित चव्हाण यांनी केले. दीक्षांत समारंभास शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी, प्रगतशील शेतकरी, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, स्नातक आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते
२७ व्या दीक्षांत समारंभातील पदके, बक्षिसे व प्रमाणपत्रे
सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये सागर प्रमोद (पीएच.डी. कृषी वनस्पतीशास्त्र), गोरे शुभम (पीएच.डी. कृषी कीटकशास्त्र), प्रलीप्ता स्वेन (पीजी मृदशास्त्र – तीन पदके), तोरणाळे सिद्धी (युजी अन्न तंत्रज्ञान – तीन पदके), बंडला काव्या (पीजी पीक रोगशास्त्र), दसारी श्रावणी (पीजी कृषी वनस्पतीशास्त्र), नवले पूजा (पीजी कृषी विद्याशास्त्र), प्रियंका एस. एम. (पीजी कृषी कीटकशास्त्र), गुडीपती व्यंकटा (पीजी अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान), सुमा बनकर (पीजी सामुदायिक विज्ञान), मंजिमा ए. पी. (पीजी उद्यानविद्या), जाधव पूजा (पीजी जैवतंत्रज्ञान), विश्वब्रह्म कोमल (पीजी कृषी व्यवसाय व्यवस्थापन) तसेच युजी अभ्यासक्रमांत वाणी गायत्री (कृषी अभियांत्रिकी – दोन पदके), धरजाने लोकश्री. (कृषी), बनछोड भाग्यश्री. (कृषी), शिंदे पल्लवी (सामुदायिक विज्ञान), पुंड स्वाती (उद्यानविद्या), देसाई प्राजक्ता (जैवतंत्रज्ञान), आणि थावरी नितेश (कृषी व्यवसाय व्यवस्थापन) यांचा समावेश आहे.
रोख पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये पीएच.डी.साठी आवटे शुभांगी (मृद विज्ञान – दोन पुरस्कार), पीजीमध्ये दुन्ना नोहिता (मानव विकास व कौटुंबिक अभ्यास – दोन पुरस्कार), भोसले ओंकार (मृद विज्ञान), प्रियांका एस. एम. (कृषी कीटकशास्त्र), प्रलीप्ता स्वेन (मृद विज्ञान), सात्विक पंडा (हवामानशास्त्र), तसेच युजी अभ्यासक्रमांत शिंदे पल्लवी (सामुदायिक विज्ञान), वाणी गायत्री (कृषी अभियांत्रिकी) आणि देसाई प्राजक्ता (जैवतंत्रज्ञान) यांचा समावेश आहे.
विशेष प्राविण्य प्रमाणपत्र प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये नवले पूजा, दसारी श्रावणी, चौधरी आचल, पठाण सोहेल, देविका ए., अनुसया के., मुळे नागेंद्र, वाघ श्रेयश, प्रियंका एस. एम., बंडला काव्या, प्रलीप्ता स्वेन, सात्विक पंडा, जाधव पूजा, गुडीपती व्यंकटा, दसारी प्रियंका, सुमा बनकर, दुन्ना नोहिता, पवित्रा एस., वाकळे प्रतीक्षा, मुंजिमा ए. पी., आणि विश्वब्रह्म कोमल यांचा समावेश आहे.
‘शेतकरी शास्त्रज्ञ’ पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकऱ्यांची नावे
सर्वसाधारण गटातील निवड
श्री.चंद्रकांत अंबादासराव देशमुख, मु.वरपूड ता.जि. परभणी
श्री. यज्ञेश वसंतराव कात बने, मु. धनेगाव पोस्ट ढोरकीन, ता. पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर
श्री. प्रताप किशनराव काळे, मु. धानोरा (काळे) पोस्ट कळगाव, ता. पूर्णा, जिल्हा परभणी
श्री. श्रीकांत बेलेश्वर आखाडे, मु. वालसावंगी, ता. भोकरदन, जिल्हा जालना
श्री. सुदर्शन शिवाजी जाधव, मु. गंजेवाडी, ता. तुळजापूर जिल्हा धाराशिव
श्री. शरद बाबुराव पाटील मु. मावलगाव, ता. अहमदपूर, जिल्हा लातूर
श्री. भगवान रामजी इंगोले, मु. पोस्ट मालेगाव, ता. अर्धापूर, जिल्हा नांदेड
श्री. अण्णासाहेब अर्जुनराव जगताप, मु. सावरगाव, ता. माजलगाव, जिल्हा बीड
श्री. सदाशिव वामनराव अडकिने, मु. इंजनगाव, ता. वसमत, जिल्हा हिंगोली
महिला शेतकरी गट
श्रीमती मीरा जनार्धन आवरगंड मु. माखणी, ता. पूर्णा, जिल्हा परभणी
श्रीमती सुनंदा शिवाजी क्षीरसागर, मु. पांगरा, पोस्ट चितेगाव, ता. पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर





