ह.भ.प. पद्मनाभ महाराज व्यास यांचे प्रतिपादन, श्रीसोनामाय प्रतिष्ठानच्या श्रीमद् भागवत कथा सप्ताहास मोठा प्रतिसाद
सेलू : सृष्टीतील सर्व जिवात्मे समान आहेत. एवढेच नव्हे तर प्रत्येकात भगवंताचे अस्तित्व आहे, त्यामुळे कुणाचाच द्वेष करू नये. भारतीय संस्कृती जिवमात्रासह वृक्षवल्ली, पशूपक्षी, पर्यावरण, सर्वांचा सन्मान करायला शिकविते, असे प्रतिपादन वे.शा.सं.ह.भ.प. पद्मनाभ व्यास महाराज (धाराशिव) यांनी केले आहे. ते शहरातील साई मंदिर, ‘भक्तितीर्थ’ परीसरात, श्रीसोनामाय प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित भागवत कथेत भाविकांना आशीर्वचनपर सोमवार (दि. १५) रोजी तीसरे पुष्प गुंफताना बोलत होते.
तीर्थयात्रेचे पावित्र्य आणि सात्विक जीवन : ज्ञानमार्गने परमशक्तीला जाणणे यातच जीवनाची कृतार्थता आहे. तीर्थयात्रेला जाताना साधेपणा असावा. शृंगार, पोषाख सात्विक, विनयशील असावा. तीर्थ यात्रा आणि तीर्थ स्थानाचे पावित्र्य राखणे आपले कर्तव्य आहे. आपण शुद्ध मन, वृत्तीने जीवन जगले पाहिजे. सद्विचाराने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हेच श्रीमद् भागवत कथा सांगते. कथा श्रवणाने जिवनाचे सार्थक होते, असेही पद्मनाभ महाराज व्यास म्हणाले. यावेळी कथेचे विस्तृत विवेचन करताना ते म्हणाले की, आपले विचार लोकहीत करणारे असावेत. श्रवण, किर्तन, स्मरण, चिंतन, वर्तन, अध्ययन चांगले असावे. आपला वेळ सार्थकी लावावा.
पतीपत्नी संसार रथाची दोन चाके :
पतीपत्नी हे संसार रथाचे दोन चाके आहेत. पतीपत्नीने संतुलित रित्या व्यवहार करावा. एकमेकांना समजून घ्यावे. स्त्रियांना सन्मानाची वागणूक देणे ही आपली संस्कृती आहे. घरात राहून परमार्थ साधावा. आपले कर्म, संसार निष्ठेने करत भावी संस्कारित पिढी घडवावी. सासू, सासरे, पतीची सेवा करणे हाच खरा धर्म आहे. माणसाने न्याय मार्गाने धन कमवावे, असे आवाहनही पद्मनाभ महाराज व्यास यांनी केले आहे.
भजनाने कथेचा प्रारंभ, मान्यवरांच्या हस्ते आरती
कथेच्या प्रारंभी सच्चिदानंद डाखोरे यांनी भजन गायले. सुत्रसंचलन प्रकाश कुरूंदकर, अनिल रत्नपारखी यांनी केले. श्रीमद् भागवत कथेत मिना शशिकांत कुलकर्णी, सुनंदा शरद कुलकर्णी, रवी मुळावेकर, रवी कुलकर्णी, नारायण इक्कर, गौतम सूर्यवंशी, सर्जेराव लहाने, रामराव गायकवाड, मंगल शरद ठाकर, कांचन सुरेश हिवाळे, भाग्यश्री पांडुरंग पाटणकर, डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांच्या हस्ते आरती करण्यात आली. या कथेस भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





