परभणी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून संचालकांच्या २१ जागांसाठी तब्बल १८२ अर्ज दाखल झाले आहेत. यासाठी १९ जूलै रोजी मतदान होणार आहे. तर २० जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. परभणी जिल्हा बँक संचालकांच्या २१ जागांकरीता निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला. या कार्यक्रमानुसार मंगळवारी, २३ जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती.
उमेदवारी अर्जांची छाननी २४ जून रोजी होणार आहे. तर वैध उमेदवारांची यादी २५ जून रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारी अर्ज २५ जून ते ९ जुलै या कालावधीत मागे घेण्याची मुदत आहे. उमेदवारांची अंतिम यादी आणी चिन्हवाटप १० जुलै रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येईल. तर रविवारी, १९ जुलै रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत प्रत्यक्ष मतदान होणार आहे. आणि मंगळवारी, २० जुलै रोजी मतमोजणी करण्यात येईल.
या निवडणुकीसाठी प्राथमिक कृषी पतपुरवठा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून – १४ जागांसाठी ७६, कृषी पणन संस्था व शेतमाल प्रक्रिया संस्था – १ जागेसाठी ७ , इतर शेती संस्था – १ जागेसाठी ३०, महिला राखीव – २ जागांसाठी २०, अनुसूचित जाती अथवा जमाती – १ जागेसाठी १८, इतर मागासवर्ग -१ जागेसाठी १० आणी विमुक्त जाती व भटक्या जमाती अथवा विशेष मागासवर्ग – १ जागेसाठी २१ अशा एकूण २१ संचालकांच्या जागांसाठी १८२ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत.
छाननीनंतर आक्षेपावर सुनावणी
दरम्यान, बुधवारी, २४ जून रोजी उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेनंतर दाखल आक्षेपांवर सायंकाळी उशीरापर्यंत सुनावणी सुरू होती. वैध उमेदवारांची यादी २५ जून रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती निवडणूक विभागाने दिली.




