पाथरीकरांचे ३५ वर्षांचे स्वप्न साकार : आमदार सईदखान

पाथरी : गेल्या अनेक वर्षांपासून शिवभक्तांची मागणी असलेल्या पाथरीतील सेलू कॉर्नर भागात नव्याने बांधलेल्या भव्यदिव्य चबुतऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा रात्री बसवण्यात आला. या शिवस्मारकाचे लोकार्पण रविवार, २८ जून रोजी सकाळी १० वाजता खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
यावेळी विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार सईदखान यांनी पुतळा उभारणीच्या संघर्षावर भाष्य करत आपली भूमिका स्पष्ट केली. “नगरविकास मंत्रालयाने परवानगी दिली असून स्थानिक जिल्हा प्रशासनाची परवानगी काही स्थानिक नेत्यांनी आडकाठी आणल्याने राहिली. मी याची पर्वा करत नाही. मी विधानसभा कार्यक्षेत्रातील जनतेला शब्द दिला होता की आमदारकीची शपथ घेण्याआधी पुतळा बसवेन. त्यामुळे मी परवानगीची पर्वा न करता पुतळा बसवून माझा शब्द पूर्ण केला. कितीही केसेस होऊदेत, मी अंगावर घेण्यास समर्थ आहे. काय व्हायचं ते होऊदे,” असे ठाम प्रतिपादन करत आमदार सईद खान यांनी स्मारकाचे समर्थन केले. “गेल्या ३५ वर्षांपासून पाथरीकरांची मनापासून इच्छा होती की, सेलू कॉर्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारला जावा. मात्र काही स्वार्थी प्रवृत्तींच्या अडथळ्यांमुळे हे स्वप्न अनेक वर्षे अपूर्ण राहिले,” असे आमदार सईदखान म्हणाले. “काही वर्षांपूर्वी मी पाथरीकरांना शब्द दिला होता की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येथे उभारणारच!’ त्या शब्दपूर्तीसाठी अनेक अडचणी, विरोध आणि संघर्षांचा सामना करावा लागला. पण शिवरायांचा मावळा म्हणून मी कधीही मागे हटलेलो नाही आणि सातत्याने प्रयत्न करत राहिलो.” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आशीर्वादाने तसेच खासदार संजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी नगराध्यक्ष असेफखान, शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक व हजारो शिवप्रेमी उपस्थित होते.





