समाजातील दानशूरांच्या सहकार्यातून कौतुकास्पद उपक्रम, सुनील गायकवाड यांचा पुढाकार
सेलू : हेलस येथील साने गुरुजी कथामालेचे संस्थापक कै. दत्तात्रय हेलसकर यांच्या प्रेरणेतून आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘हात मदतीचा’ या शालेय साहित्य वाटपाच्या सामाजिक उपक्रमाचा मागील आठ वर्षांत २७९३ विद्यार्थ्यांना लाभ मिळाला असून, या वर्षी येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयातील वसंतराव खारकर सभागृहात शुक्रवारी, ३ जुलै २०२६ रोजी गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी ५१ विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी माधव लोकुलवार होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राम सोनवणे, मुख्याध्यापक संजय धारासुरकर, नगरसेविका शांताबाई रघुवंशी, संयोजक सुनील गायकवाड, प्रा.राजेश बाहेती, केंद्रप्रमुख शेख मोजम, विजय तुरकर, प्रशांत रघुवंशी, सामाजिक कार्यकर्ते विक्रांत पाटील, देवेंद्र कुरा, शुकाचार्य शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, ज्येष्ठ पत्रकार राम सोनवणे व विक्रांत पाटील यांनी ‘हात मदतीचा’ या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. तसेच, सेलू शहरातील दानशूरांनी याकामी आर्थिक सहकार्य करून हा कार्यक्रम आणखी मोठा करावा, असे आवाहनही त्यांनी केले. दलितमित्र श्रीरामजी भांगडिया यांच्या शतकोत्तर रजत जयंती वर्षातील स्मृतिदिनाचे औचित्य साधून आणि साने गुरुजी कथामालेचे संस्थापक कै. दत्तात्रय हेलसकर यांच्या प्रेरणेतून ‘हात मदतीचा’ उपक्रम सुरू करण्यात आला. मागील आठ वर्षांत २७९३विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले असून सेलू शहरातील एकूण ५ शाळांत सेलू शहरातील दानशूरांच्या तसेच सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम शहरात राबविला जातो, असे संयोजक सुनील गायकवाड यांनी प्रास्ताविकात सांगितले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्रीरामजी भांगडिया व दत्तात्रय हेलसकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन योगेश ढवारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमिता जवळेकर, जयश्री सोन्नेकर, कृष्णा पांचाळ, रूपाली कुर्डे, धीरज दूधगोंडे, विठ्ठल काळे, बाबासाहेब बदाले, श्याम मुंडे आदींसह शिक्षक आणि संयोजन समितीने परिश्रम घेतले.





