पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर कलेचे सादरीकरण, दोन फेऱ्यांमध्ये आयोजन, परभणीत २ ऑगस्ट रोजी महोत्सव
परभणी : ‘इतिहास महाराष्ट्राचा २०२६’ या उपक्रमांतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित एकपात्री, नाट्यछटा, स्वगत आणि नाटूकले सादरीकरण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बालकलाकारांमधील नाट्यगुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव दोन फेऱ्यांमध्ये पार पडणार आहे.
स्पर्धेचे स्वरूप आणि फेऱ्या
हा महोत्सव प्राथमिक आणि अंतिम अशा दोन फेऱ्यांमध्ये घेतला जाईल. प्राथमिक फेरी स्थानिक शाखास्तरावर आयोजित केली जाणार असून, ती रविवार, २ ऑगस्ट २०२६ पर्यंत पार पडेल. या प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या गुणवंत कलाकारांची अंतिम फेरी रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी अहिल्यानगर येथे सकाळी १०:०० वाजता संपन्न होणार आहे.
वयोगट व गटविभागणी
महोत्सव तीन मुख्य गटांमध्ये आयोजित केला जात आहे:• एकल गट क्रमांक १: इयत्ता १ ली ते ५ वी• एकल गट क्रमांक २: इयत्ता ६ वी ते १० वी• गट क्रमांक ३ (समुह गट): इयत्ता १ ली ते १० वी
समुह गटामध्ये रंगमंचावर कमीत कमी ४ आणि जास्तीत जास्त ८ कलावंतांचा सहभाग असणे बंधनकारक आहे. तांत्रिक सहकार्यासाठी जास्तीत जास्त ३ व्यक्तींना परवानगी असेल.
सादरीकरणाचा कालावधी व स्वरूप
एकल गट क्रमांक १ व २ साठी सादरीकरणाचा कालावधी कमीत कमी ३ मिनिटे आणि जास्तीत जास्त ५ मिनिटे निश्चित करण्यात आला आहे. समुह गटासाठी हा अवधी कमीत कमी ५ मिनिटे आणि जास्तीत जास्त ८ मिनिटे असेल.
एकल गटातील सहभागी बालकलाकारांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित घटना, शौर्य, शिक्षण, पराक्रम, प्रेरणा आणि सामाजिक कार्य या विषयांवर एक किंवा अनेक पात्रे साकारत नाट्यमय सादरीकरण करणे अपेक्षित आहे. समुह गटातील संघांनी त्यांच्या जीवनकार्यातील विविध प्रसंगांचे जास्तीत जास्त संदर्भ देऊन नाटूकलेच्या स्वरूपात प्रभावी सादरीकरण करायचे आहे.सादरीकरण हे प्रामुख्याने नाट्यरूपात असावे; मात्र संहितेच्या आवश्यकतेनुसार गायन, वादन किंवा नृत्याची जोड देता येईल.
निवड प्रक्रिया आणि नियम
प्रत्येक शाखास्तरीय प्राथमिक फेरीतून एकल गट क्रमांक १ आणि २ मधील प्रत्येकी एका सर्वोत्कृष्ट कलाकाराची, तर समुह गटामधून एका सर्वोत्कृष्ट संघाची अंतिम फेरीसाठी निवड केली जाईल.• सर्व सहभागी आणि विजेत्या स्पर्धकांना व संघांना प्रशस्तीपत्र प्रदान केले जाईल.• अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या एकल गटातील बालकलाकारांना, तसेच समुह गटातील ८ बालकलाकार व ३ तंत्रज्ञांना मध्यवर्ती समितीकडून प्रवास खर्च (एस.टी. बस किंवा रेल्वे स्लीपर दरानुसार) दिला जाईल.• वाद्यवृंद, नेपथ्य, रंगभूषा व वेशभूषा यांची सोय बालकलाकार व संघाला स्वतः करावी लागेल. आयोजकांकडून फक्त ध्वनी व प्रकाशयोजना उपलब्ध करून दिली जाईल.• अंतिम फेरीत बालकलाकारांसाठी दुपारी भोजनाची व्यवस्था असेल.• स्पर्धेबाबत परीक्षकांचा निर्णय अंतिम आणि सर्वांवर बंधनकारक राहील.
पारितोषिके
स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम आणि पुस्तके देऊन सन्मानित करण्यात येईल:• एकल गट क्रमांक १ व २: सर्वोत्कृष्ट (रोख रक्कम व पुस्तके), उत्कृष्ट (२,००० रुपये व पुस्तके), उत्तम (१,००० रुपये व पुस्तके), लक्षवेधी सादरीकरण – २ विजेते (प्रत्येकी ५०० रुपये).• समुह गट: सर्वोत्कृष्ट (५,००० रुपये व पुस्तके), उत्कृष्ट (३,००० रुपये व पुस्तके), उत्तम (२,००० रुपये व पुस्तके), लक्षवेधी – २ विजेते (प्रत्येकी १,००० रुपये).
परभणी येथे २ ऑगस्ट रोजी महोत्सव
मराठी बालनाट्य दिनानिमित्त परभणीत ‘इतिहास महाराष्ट्राचा’ नाट्य सादरीकरण महोत्सव!अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेशी संलग्न असलेल्या बालरंगभूमी परिषद, परभणी जिल्हा शाखेच्या वतीने मराठी बालनाट्य दिनानिमित्त बालकलाकारांसाठी ‘इतिहास महाराष्ट्राचा’ या संकल्पनेअंतर्गत भव्य नाट्य सादरीकरण महोत्सव रंगणार आहे. रविवार, २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजेपासून परभणी येथील वैष्णवी मंगल कार्यालयात हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रेरणादायी जीवनकार्यावर आधारित विविध कलाप्रकारांचे सादरीकरण होणार आहे. बालकलाकारांमधील अभिनय गुणांना वाव देण्यासाठी एकपात्री, नाट्यछटा, स्वगत, नाट्य, नृत्य आणि संगीत अशा विविध कलामाध्यमांतून हा महोत्सव साकारला जाईल. या महोत्सवात जिल्ह्यातील बालकलाकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.





