परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा
परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व हिंगोली जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. सदर राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दिवाणी व फौजदारी स्वरूपाची तडजोडपात्र प्रलंबित प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणे मोठ्या प्रमाणावर निकाली काढण्यात आली.
राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून पक्षकारांना जलद, सुलभ व तडजोडीच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यावर विशेष भर देण्यात आला. तसेच विशेष ड्राईव्ह अंतर्गत फौ.प्र.सं. कलम २५६ व २५८ (कलम २७९ व २८१ भा.न्या.सं.) अन्वये असलेली प्रकरणेही निकाली काढण्यात आली. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोटार अपघात प्रकरणात एका पक्षकारास रु. ९० लाखांचा धनादेश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एम. सादराणी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सदर प्रकरण तडजोडीने निकाली काढण्यासाठी ॲड. अजय व्यास व त्यांच्या टीमने सहकार्य केले.
राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी करण्याकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एम. सादराणी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच हिंगोलीचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एल. आणेकर यांच्या सहकार्यामुळे, परभणी व हिंगोली जिल्ह्यांतर्गत कार्यरत सर्व सन्माननीय न्यायाधीश, जिल्हा वकील संघ अध्यक्ष आणि सर्व सन्माननीय वकील संघ यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. सदर लोकन्यायालय यशस्वी करण्यासाठी सर्वांनी दिलेल्या योगदानाबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव भूषण म. काळे यांनी आभार मानले.





