श्री केशवराज मंदिरात श्रावणमासी प्रवचनमालेचे २२ व्या वर्षातील सातवे पुष्प; भगवंताच्या नामस्मरणातच खरी भक्ती
सेलू : कोणतीही कथा अथवा प्रवचन कीर्तन ऐकताना एकाग्र चित्त करणे गरजेचे आहे. कथेमध्ये प्रेम असणे गरजेचे आहे. तरच त्याला भक्ती म्हणतात. एवढेच नव्हे तर भगवंताच्या नामस्मरणातच खरी भक्ती असल्याचे प्रतिपादन ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज वालूरकर यांनी स्पष्ट केले आहे. ते येथील ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब मंदिर परिसरातील श्रावणमासी प्रवचन मालेतील २२ व्या वर्षातील सातवे पुष्पगुंफताना बुधवार १९ ऑगस्ट रोजी आशीर्वाचनपर बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, अंतरी भिन्न भावना असेल तर, कितीही श्रवण केले तर श्रोत्यांना तथा भाविकांना पुण्य मिळत नाही. ज्याप्रमाणे गोपिकांनी भगवान श्रीकृष्णाची भक्ती केली, भगवान श्रीकृष्णावर प्रेम केले, अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक भाविकांनी देखील भगवंतावर प्रेम करावे. भगवंताची भक्ती करावी. देवाचे नामस्मरण करावे. कारण ईश्वराला फक्त भावाची आवश्यकता आहे. भाव हेच एकमेव भक्तीचे साधन आहे. साध्य आहे. तरच भगवंताची प्राप्ती होते. देवाला फक्त भाव पाहिजे. वित्त पाहिजे नाही. आपण नोटांचा हार अर्पण करतो, हे केवळ प्रदर्शन आहे. देवाला हे अपेक्षितच नाही. देवाला आपले चित्त पाहिजे. परमार्थात चित्त, व्यवहारात वित्त, अंगात पित्त, आणि गावात मत असले पाहिजे.
परमार्थासाठी वयाची कोणतीही अट नाही. तारुण्यात, बालवयात, वृद्धापकाळात देखील परमार्थ करता येतो. कारण भगवान खऱ्या भावाचा भुकेला आहे. भगवंत पूजेचे साहित्य बघत नाही. भगवंत गरीब श्रीमंत शिष्य बघत नाही. केवळ भक्ताच्या ठिकाणी भाव असला पाहिजे. देवाला इतर काही आवश्यकता नाही. भक्तीने श्रवण केले तर श्रवणाचे फळ मिळते. आपल्याकडे पाश्चात्य संस्कृती स्वीकारल्या जात आहे. मात्र भारतीय संस्कृती टिकवणे गरजेचे आहे. आपल्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील तथा, प्रसिद्ध भजन सम्राट गोदावरीताई मुंडे यांनी भारतीय संस्कृती टिकवली. त्याचे प्रदर्शन केले. त्यांचाच आदर्श या पुढील पिढीने घेतला पाहिजे. प्रत्येकाने भारतीय संस्कृती टिकवून भजनामध्ये प्रेम केले पाहिजे.वारकरी संप्रदायातील हैबतबाबा यांनी माऊलींच्या मंदिरात भजन केले तर, माऊलींची समाधी डोलत असे.
वारकरी संप्रदायाची संत, ग्रंथ, व परंपरा यावर भक्ती अवलंबून आहे. कीर्तन व प्रवचन श्रवण करत असताना प्रेम आवश्यक आहे. प्रेम नसेल तर त्याचे फळ मिळत नाही. कीर्तन प्रवचन श्रवणाचे फळ मिळण्यासाठी डोळ्यात अश्रू आले पाहिजेत, कंठ दाटून आला पाहिजे, हृदय भरून आले पाहिजे, आणि एवढेच नव्हे तर अंगावर काटे आले पाहिजेत, तरच प्रत्येक भाविकांना प्रवचन व कीर्तन श्रवणाचे फळ मिळते, असे ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज वालूरकर यांनी आशीर्वचनपर बोलताना स्पष्ट केले.रघुराज सोन्नेकर यांच्या पसायदानाने प्रवचनाची सांगता झाली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





