समुपदेशक आर.जी.मखमले यांचे प्रतिपादन
सेलू : पालकांनी आपल्या अपेक्षांचे ओझे न लादता, पाल्यांतील सुप्त गुणांचा शोध घेऊन योग्य क्षेत्राची निवड करण्यासाठी त्याचा कल आणि बुद्धिमत्ता ओळखूनच करिअरची निवड करावी, असे प्रतिपादन नूतन विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक तथा समुपदेशक आर.जी.मखमले यांनी केले.
येथील राधाबाई कान्हेकर शारदा विद्यालयात पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने २४ मार्च २०२६ रोजी आयोजित व्यवसाय व उद्योजकता मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप सत्रात मार्गदर्शन करताना समुपदेशक आर.जी.मखमले बोलत होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, डी.डी.शिंदे, दत्ता रोकडे यांची उपस्थिती होती. प्रशिक्षणात उद्योजक विलास पौळ, व्यवसाय विज्ञ किरण देशपांडे, सु.ल.जोशी, केंद्रप्रमुख मधुकर काष्टे, पी.एन.कांबळे, सुभाष मोहकरे यांनी विचार मांडले. सुनीता काळे यांनी आभार मानले.
श्री.मखमले यांनी विविध उदाहरणे देत सांगितले की, केवळ गुणांच्या आधारे किंवा प्रतिष्ठेसाठी पालकांनी मुलांवर विशिष्ट अभ्यासक्रम लादू नयेत. राईट स्टुडंट राईट प्लेस म्हणजेच योग्य विद्यार्थी योग्य क्षेत्रात जाणे ही आजच्या काळाची गरज आहे. जर विद्यार्थी त्याच्या आवडीच्या आणि क्षमतेच्या क्षेत्रात गेला, तरच तो स्वतःची आणि समाजाची प्रगती साधू शकतो. सकारात्मक विचार आणि आनंदी जीवन हीच यशस्वी जीवनाची खरी गुरुकिल्ली आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
समुपदेशनाचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, दहावी आणि बारावीच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांचा कल कोणत्या दिशेला आहे हे जाणून घेण्यासाठी मानसशास्त्रीय चाचण्या अत्यंत उपयुक्त ठरतात. मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये एप्रिल ते जून या काळात हजारो विद्यार्थी आणि पालक करिअर मार्गदर्शनासाठी रांगा लावतात. पालकांनी आपल्या मुलांशी संवाद साधून, त्यांची आवड आणि क्षमता लक्षात घेऊनच त्यांना पुढील शिक्षणासाठी दिशा द्यावी. चुकीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान तर होतेच, पण त्यासोबतच तो मानसिक तणावाखाली देखील येऊ शकतो.
विशेषतः कल चाचणी आणि बुद्ध्यांक चाचणीच्या निकालावर भाष्य करताना त्यांनी ‘स्टेनाइन’ (Stanine) स्केलचे महत्त्व सांगितले. यामध्ये १ ते ९ पर्यंतचे निकष असतात. १ ते ३ मध्ये येणारे विद्यार्थी सरासरीपेक्षा कमी, ४ ते ६ मधील मध्यम आणि ७ ते ९ मधील विद्यार्थी उत्कृष्ट श्रेणीत येतात. ही चाचणी केवळ गुणांवर आधारित नसून विद्यार्थ्याच्या नैसर्गिक अभियोग्यतेवर (Aptitude) आधारित असते. यामुळे विद्यार्थ्याला कोणत्या विषयात रस आहे आणि त्याची बौद्धिक क्षमता कोणत्या क्षेत्रासाठी योग्य आहे, याचे अचूक निदान होते.कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी पालकांना आवाहन केले की, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. जर एखाद्या परीक्षेत किंवा चाचणीत विद्यार्थी मागे पडला, तर त्याला खचू न देता त्याच्यातील इतर कौशल्यांना वाव दिला पाहिजे. प्रशिक्षणात विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.





