‘देशी गोवंश, नैसर्गिक शेती व मसाला पिके’ परिसंवादास शेतकरी व महिला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

परभणी : भारत सरकारची राष्ट्रीय कृषि विकास योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागात ‘नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी प्रगत कीटकनाशक तपासणी व अवशेष विश्लेषण प्रयोगशाळेचे’ उद्घाटन तसेच ‘देशी गोवंश, नैसर्गिक शेती व मसाला पिके’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने १५ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले.
प्रयोगशाळेचे आणि परिसंवादाचे उद्घाटन कृषि मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, परभणी महानगरपालिकेचे महापौर सय्यद इकबाल सय्यद खाजा तसेच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्रीकांत विटेकर यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश विटेकर तसेच सेलू नगरपरिषदेचे अध्यक्ष मिलिंद सावंत उपस्थित होते.
या वेळी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्यासह संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, कुलसचिव पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता दीपक कशाळकर, लातूर विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक महेशकुमार तीर्थकर, परभणी आत्माचे संचालक दौलत चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भास्कर कोळेकर (परभणी), प्रदीप कच्छवे (हिंगोली) यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, शास्त्रज्ञ, कर्मचारी, विद्यार्थी, शेतकरी व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रयोगशाळेच्या उद्घाटनानंतर मान्यवरांनी वनस्पती रोगशास्त्र विभागांतर्गत कार्यरत बायोमिक्स प्रयोगशाळेला तसेच अन्न तंत्र महाविद्यालयातील सामूहिक उबवणूक केंद्राला (कॉमन इन्क्युबेशन सेंटर) भेट देऊन तेथील कार्याची माहिती घेतली.
परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना कृषि मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, पर्जन्यमानातील अनिश्चितता आणि बदलत्या हवामान परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने निर्माण झाली असून, त्याचा शेती उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे इतकेच नव्हे तर मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचली पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.
या वेळी त्यांनी माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतींना उजाळा देत, शेतकरी म्हणून त्यांनी केलेल्या निष्ठापूर्ण कार्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. आपण स्वतः शेतकरी कुटुंबातून आलो असल्याने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याची आपली बांधिलकी असल्याचे त्यांनी नमूद केले.
विद्यापीठाने विकसित केलेले विविध कृषि तंत्रज्ञान, आधुनिक कृषि अवजारे व यंत्रसामग्री शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. या तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे अवलंब करून उत्पादनक्षमता तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली वर्ष २०२६ हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून साजरे केले जात असताना, महाराष्ट्र शासनाने महिला शेतकऱ्यांच्या योगदानाला योग्य मान्यता देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. महिला शेतकऱ्यांना तंत्रज्ञान, बाजारपेठ, वित्तपुरवठा आणि निर्णयप्रक्रियेत समान संधी मिळणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
महिला शेतकरी पहाटेपासून शेतात कष्ट करण्यासोबतच कुटुंबातील जबाबदाऱ्याही समर्थपणे पार पाडतात. त्यांच्या या योगदानाचा सन्मान होणे आवश्यक आहे. महिला सक्षम झाल्यास कुटुंबाबरोबरच समाजाची प्रगतीही अधिक वेगाने होते, असेही कृषि मंत्री भरणे यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने कर्जमाफीसह विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून, शेतीचे आरोग्य सुधारण्यासाठी रासायनिक निविष्ठांचा अनावश्यक वापर कमी करून सेंद्रिय निविष्ठांचा वापर वाढविणे गरजेचे आहे. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत शाश्वत शेतीच्या दिशेने वाटचाल करणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या मोफत वीज योजनेची माहितीही त्यांनी या वेळी दिली.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात स्थापन करण्यात आलेल्या प्रगत कीटकनाशक तपासणी व अवशेष विश्लेषण प्रयोगशाळेच्या माध्यमातून शेतमालातील कीटकनाशक अवशेषांची तपासणी करणे, सुरक्षित अन्न उत्पादनाला चालना देणे तसेच नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे शक्य होणार आहे. ही प्रयोगशाळा शेतकरी, ग्राहक आणि संपूर्ण कृषि क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आनंदी व प्रसन्न जीवन जगावे. सर्वासोबत आपुलकीचे संबंध जपावेत, असे आवाहन करताना त्यांनी उपस्थितांना आनंद द्यावा आणि आनंद घ्यावा असा संदेश दिला. कृषि शिक्षण घेणारे विद्यार्थी, शेतकरी आणि संपूर्ण कृषि क्षेत्राच्या कल्याणासाठी शासनाच्या माध्यमातून सातत्याने कार्य करण्याची ग्वाहीही त्यांनी या वेळी दिली.
विद्यार्थ्यांशी साधला संवाद
कार्यक्रमानंतर कृषि मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विद्यापीठातील कृषि व संलग्न शाखांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कठोर मेहनत घ्या, प्रामाणिकपणे कार्य करा, नीती-मूल्यांचे पालन करा आणि आई-वडिलांचा सन्मान करा.” कृषि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी भविष्यातील कृषि क्षेत्राच्या विकासासाठी ज्ञान, तंत्रज्ञान आणि मूल्यांची सांगड घालत कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेतून केंद्र शासनाने शेतकरी कल्याणासाठी विविध योजना राबविल्या जात असून, त्यातून शेतकऱ्यांचा आत्मसन्मान वाढण्यास मदत झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्ज मुक्त योजना आणली असून, शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज घेण्याची गरज पडू नये, या उद्देशाने शासन कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या वीज थकबाकीबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयांचाही त्यांनी उल्लेख केला. जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने महिला शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत असून, त्यांना समाजात योग्य ओळख आणि सन्मान मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
आपण स्वतः सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करत असल्याचे सांगत सेंद्रिय व नैसर्गिक शेती ही काळाची गरज झाली आहे, त्यामुळे विद्यापीठाने आयोजित केलेला हा परिसंवाद अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. परिसंवादातून मिळणारे ज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करून प्रत्यक्ष शेतीमध्ये त्याचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले.
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी प्रत्येकी पाच शेतकरी दत्तक घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शास्त्रज्ञांनी कार्य पूर्ण करून शाश्वत शेतीला चालना दिल्याचे त्यांनी सांगितले.
पश्चिम महाराष्ट्रातील प्रगत शेतीचे उदाहरण दिले जाते; त्याच धर्तीवर परभणी आणि मराठवाड्यातही प्रगत व फायदेशीर शेती विकसित व्हावी यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. ‘सिल्क अँड मिल्क’ तसेच कृषि प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी पुढाकार घेतला जात असून, या योजना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कृषि प्रक्रिया उद्योगांना चालना देणे ही आपली जबाबदारी समजून आपण सातत्याने प्रयत्न करणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या वेळी त्यांनी कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील शेतीच्या विकासासाठी विद्यापीठाकडून प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू असल्याचे नमूद केले. विद्यापीठातील संशोधन, तंत्रज्ञान आणि ज्ञानाचा प्रत्यक्ष लाभ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आजच्या कार्यक्रमात महिला शेतकरी आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग उल्लेखनीय असल्याचे नमूद करून, विद्यापीठाच्या प्रशिक्षण व विस्तार उपक्रमांमुळे महिला शेतकरी आणि विद्यापीठ यांच्यातील संपर्क अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी कौतुकाने सांगितले.
स्वागतपर भाषणात कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कृषि मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी, विद्यार्थी आणि विद्यापीठाच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याबद्दल तसेच विद्यापीठास भेट देऊन विविध उपक्रमांची पाहणी केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचेही त्यांनी स्वागत व आभार मानले.
या वेळी कुलगुरूंनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा घेत विद्यापीठाने शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण क्षेत्रात मिळविलेल्या उल्लेखनीय यशाची माहिती दिली.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास, उद्योजकता आणि नवोपक्रमाची क्षमता विकसित करण्यावर विद्यापीठाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. संशोधन क्षेत्रातही विद्यापीठाने उल्लेखनीय कामगिरी केली असून, विद्यापीठाच्या २५ अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पांपैकी १० संशोधन केंद्रांनी देशपातळीवर अव्वल स्थान मिळविले असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘शेतकरी देवो भव’ या भावनेतून विद्यापीठाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत’ या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यापीठातील शास्त्रज्ञ थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करीत आहेत. तसेच दर मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी ७ ते ९ या वेळेत ऑनलाइन ‘शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद’ आयोजित करण्यात येत असून, त्यातून शेतकरी-शेतकरी आणि शेतकरी-शास्त्रज्ञ यांच्यातील संवादाच्या माध्यमातून कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ११ प्रगतिशील शेतकऱ्यांना ‘शेतकरी शास्त्रज्ञ’ म्हणून सन्मानित करण्यात आले असून, पद्मश्री दादा लाड यांना डी.एस्सी. पदवी देऊन गौरविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना विविध निविष्ठांचे वितरण
कार्यक्रमादरम्यान विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्राथमिक स्वरूपात प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच MIDH योजनेअंतर्गत हळद उत्पादक शेतकऱ्यांना विद्यापीठाच्या बायोमिक्स उत्पादनाचे वितरण कृषि मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी पूर्णा व पालम तालुक्यांतून आलेल्या शेतकरी गटांनी कृषि मंत्री दत्तात्रय भरणे यांचा विशेष सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव आणि डॉ. रणजित चव्हाण यांनी केले, तर आभार डॉ. सुनीता पवार यांनी मानले. या कार्यक्रमास परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील १२०० हून अधिक शेतकरी व महिला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.





