परभणी : संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेत लिहिलेल्या ‘श्री ज्ञानेश्वरी’च्या इंग्रजी आवृत्तीचे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते नागपूर येथील सायंटिफिक सभागृहात झाले. डॉ. तुकाराम गरुड आणि डॉ. मीरा तुकाराम गरुड यांच्या लेखन कार्याचा गौरव करणारा हा सोहळा रविवार, ३० नोव्हेंबर रोजी पार पडला.
यावेळी व्यासपीठावर इंग्रजी आवृत्तीचे संपादक डॉ.सुरेंद्र सुर्यवंशी, डॉ.तुकाराम गरूड, डॉ. मीरा तुकाराम गरुड आणि डॉ. रजनी सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात भारतीय भाषा आणि मातृभाषेच्या कमी वापराबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, भारतीय परंपरा लोकांना स्वतःच्या फायद्यापलीकडे जाऊन कुटुंब आणि समाजाच्या कल्याणाचा विचार करायला शिकवते. भगवद्गीतेत जगाचे सत्य, ज्ञान आणि सारांश सामावलेला आहे. ‘आस्थे’शिवाय ज्ञान रावणासारखे धोकादायक ठरू शकते. तसेच, पंखांशिवाय पक्षी उडू शकत नाही, तसे ज्ञान आणि कर्म या दोन पंखांची आपल्याला गरज आहे.
डॉ. तुकाराम गरुड यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, गीता आणि ज्ञानेश्वरी विश्वाची प्रगती व शांती टिकवून ठेवण्यासाठी मानवाला मार्गदर्शन करतात. मानवाच्या परिपूर्ण विकासाची त्रिसूत्री म्हणजे ज्ञान, कर्म आणि भक्ती होय. संत वाङ्मय विश्वाच्या सुखसमृद्धीचा विचार करणारे असल्याने, आम्ही त्याला इंग्रजीमध्ये रूपांतरित केले. वारकरी संप्रदायाच्या इतिहासात हा दिवस सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल, असेही ते म्हणाले. या समारंभासाठी परभणीहून अनेक मान्यवर नागपूर येथे उपस्थित होते.
ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच
स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...





