पालममध्ये बैलगाडीवरून पान टपरी हलवताना विजेच्या धक्क्याने दुर्दैवी अपघात, अन्य तिघे जखमी
पालम : शहरात एका दुर्दैवी अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून, 3 जण जखमी झाले आहेत. हा अपघात पान टपरी हलवत असताना विजेच्या तारेचा धक्का लागल्याने झाला. शेख शफीक शेख मुसा (वय ३१), हे बालाजी नगर, पालम येथे राहत होते. त्यांची पान टपरी बैलगाडीने बालाजी नगर येथील त्यांच्या घरी हलवत असताना रविवारी, १४ सप्टेंबररोजी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास हा अपघात घडला.
बैलगाडीवरून पान टपरी खाली घेत असताना अचानक बैलगाडीवरील लोखंडी दांडी वर होऊन विजेच्या तारेला स्पर्श झाला. यामुळे विजेचा जोरदार धक्का बसून काम करणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये सिद्धार्थ नरहरी बावळे (वय ३५, रा. जवळा, ता. पालम), शेख शफीक शेख मुसा (वय ३१, रा. बालाजी नगर, पालम) आणि शेख शौकत शेख मुसा (वय ४०, रा. बालाजी नगर, पालम) यांचा समावेश आहे. या अपघातात शेख फरहान शेख महेबूब (वय १६), अशोक शाखेर शेख (वय १८) आणि शेख असलम शेख गुड्डू (आयेशा कॉलनी, पालम) हे तिघे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी साई हॉस्पिटल, लोहा येथे दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.





