निकाल ९०.०२ टक्के, मुलींनीच मारली बाजी; परभणी, पाथरी, जिंतूर तालुक्याचा निकाल ९० टक्क्यांपुढे
परभणी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. परभणी जिल्ह्याचा एकूण निकाल ९०.०२ टक्के लागला असून या निकालात पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली आहे. तर छत्रपती संभाजीनगर विभागात निकालात परभणी जिल्हा अवल्ल ठरला आहे.
निकालात मुलींचे वर्चस्व
परभणी जिल्ह्याच्या निकालात मुलींच्या यशाची टक्केवारी ९४.३८ टक्के आहे, तर ८६.३० टक्के इतकी मुले उत्तीर्ण झाली आहेत. तालुकानिहाय निकालाचा विचार करता परभणी तालुक्याने ९१.४१ टक्के निकालासह आघाडी घेतली आहे. पाथरी ९१.२२ टक्के आणि जिंतूर ९०.७२ टक्के निकालासह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहिले आहेत. सेलू तालुक्याचा निकाल ८९.६० टक्के इतका लागला आहे.
७३४४ विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य
जिल्ह्यातून एकूण २८३९३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी २५५६२ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. यामध्ये १३२२० मुले आणि १२३४२ मुली यशस्वी झाल्या आहेत. गुणवत्तेचा विचार करता ७३४४ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे. तर ८२१२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ७१७८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आणि २८२८ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
तालुकानिहाय निकाल असा :
परभणी – ९१.४१ टक्के
पाथरी – ९१.२२ टक्के
जिंतूर – ९०.७२ टक्के
सेलू – ८९.६० टक्के
सोनपेठ – ८९.३० टक्के
मानवत – ८८.७४ टक्के
गंगाखेड – ८८.५६ टक्के
पूर्णा – ८७.३२ टक्के
पालम – ८७.२८ टक्के





