वैजयंताबाई रणेर आणि रितेश काळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव
परभणी : परभणी जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालाने यंदा एका अनोख्या आणि ऐतिहासिक घटनेची नोंद केली आहे. जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच आजी आणि नातू हे दोघेही एकाच वेळी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आहेत. या दुर्मिळ योगायोगामुळे संपूर्ण जिल्ह्यात सध्या आजी आणि नातवाचा विजय चर्चेत असून त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
बाभुळगावातून आजी; एरंडेश्वरमधून नातवाचा करिष्मा
पाथरी तालुक्यातील बाभुळगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये वैजयंताबाई अण्णासाहेब रणेर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. सामाजिक क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, जनसंपर्क आणि मूलभूत प्रश्नांवरील पकड या जोरावर त्यांनी मतदारांचा विश्वास संपादन केला. महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाचा अजेंडा त्यांनी प्रभावीपणे मांडला होता.दुसरीकडे, पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर जिल्हा परिषद सर्कलमध्ये त्यांचे नातू रितेश रावसाहेब काळे यांनी तरुण नेतृत्वाचा ठसा उमटवत विजयश्री खेचून आणली. युवकांमधील लोकप्रियता आणि विकासाचा नवा दृष्टिकोन यामुळे मतदारांनी त्यांना कौल दिला आहे. एकाच वेळी घरातील दोन पिढ्या जिल्हा परिषदेच्या सभागृहात पोहोचल्याने हा विजय विशेष ठरला आहे.निवडून आल्यानंतर या दोन्ही सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ग्रामीण भागातील पाणी, रस्ते, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला. एकाच कुटुंबातील दोन सदस्यांची निवड ही परभणी जिल्ह्यासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. या विजयाबद्दल रणेर आणि काळे कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





