सर्व निवडी बिनविरोध
परभणी : जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सभापती निवडीत महिला सदस्यांनी बाजी मारली असून सर्व निवडी बिनविरोध झाल्या आहेत. गुरुवारी, २ एप्रिल रोजी पीठासीन अधिकारी उदयसिंह भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निवड प्रक्रिया पार पडली.
यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या ऐश्वर्या अजय चव्हाण यांची महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी, तर पार्वतीबाई प्रल्हादराव मुंडे यांची समाजकल्याण समिती सभापतीपदी निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली पंकज जाधव आणि शिवसेनेच्या कौशल्याबाई तुकाराम शिंदे यांची उर्वरित दोन विषय समित्यांच्या सभापतीपदी वर्णी लागली आहे.निवड प्रक्रियेत माणिकराव हरकळ, सरूबाई जाधव, सुचिता भरोसे, दिपाली चौधरी, संग्राम जामकर आणि सविताबाई मुरकुटे आदींनीही नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती, परंतु नंतर ती मागे घेण्यात आली. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेत आता अध्यक्षा लताताई वाकळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर, रश्मी खांडेकर, रेखा काळम, श्रीमती भोजने आणि डॉ. सविता बिरगे – वाडियार अशा महत्त्वाच्या पदांवर महिला कार्यरत असून नवीन निवडीमुळे हा सहभाग अधिक ठळक झाला आहे.




