महाविकास आघाडीच्या नेत्यांची ग्वाही, नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार
परभणी : परभणीकर जनतेने मतरूपी आशीर्वाद आमच्या पारड्यात टाकला आहे. परभणीकरांचा आशीर्वाद वाया जाऊ देणार नाही. येत्या पाच वर्षांत परभणी शहर विकासाच्या दृष्टीने सर्वांगाने बदललेले दिसेल, अशी शब्दग्वाही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली आहे.
परभणी महानगरपालिकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस यांची सत्ता आली आहे. या दोन्ही पक्षाच्या नूतन नगरसेवकांचा सत्कार आणि शिवसेनेच्या पदाधिकार्यांची आढावा बैठक अक्षदा मंगल कार्यालयात शनिवारी, १७ जानेवारी रोजी पार पडली. यावेळी खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, माजी आमदार सुरेश देशमुख, जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आनेराव, प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, महानगरप्रमुख डॉ.विवेक नावंदर, महिला जिल्हा प्रमुख अंबिका डहाळे, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, माजुलाला, सय्यद कादर, मुजाहीद खान, रविराज देशमुख, नदीम इनामदार, सूर्यकांत हाके, संजय गाडगे, सदाशिव देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सर्व नूतन नगरसेवकांचा खासदार संजय जाधव आणि आमदार पाटील व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी खासदार संजय जाधव म्हणाले, महापालिका निवडणुकीत भाजपाने सत्तेचा दुरुपयोग केला. अफाट पैसा वाटला, परंतू तरीही जनतेने त्यांना नाकारले. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या वार्डात देखील भाजपाचा पराभव झाला. त्यामुळे त्यांनी आत्मपरीक्षण करावे असा सल्ला खासदार जाधव यांनी दिला.
आमदार डॉ.पाटील म्हणाले, शिवसेना आणि काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये सर्व जाती-धर्मातील नगरसेवकांचा समावेश आहे. राज्यातील सत्तेच्या जोरावर महापालिकेत सत्तास्थापनेचे भाजपाचे स्वप्न परभणीकरांनी धुळीस मिळवले. परभणीकरांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आम्ही सार्थ करून दाखवू. सरकारने आम्हाला सावत्रपणाची वागणूक न देता परभणीच्या विकासासाठी निधी द्यावा अशी मागणी केली. आम्ही शासन दरबारी भांडून निधी खेचून आणुत. येत्या पाच वर्षात परभणीचा चेहरा-मोहरा बदलून टाकू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. माजी आमदार सुरेश देशमुख मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, यावेळी परभणी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या परभणी विधानसभा मतदार संघातील पदाधिकार्यांची आढावा बैठक झाली. गटनिहाय उमेदवारी बाबत चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाला नंदकुमार आवचार, संदीप झाडे, सुभाष जोंधळे, ज्ञानेश्वर पवार, विशु डहाळे, बाळराजे तळेकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





