पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा करिष्मा : जिल्हा परिषद, पंचायत समितीत भाजपचे ऐतिहासिक यश, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गजांचा पराभव

सेलू : सेलू तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ चे निकाल सोमवारी, ९ फेब्रुवारी २०२६ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी शोभा जाधव यांनी अधिकृतपणे जाहीर केले आहेत. या निकालाव्दारे सेलू तालुक्यात भाजपचा डंका दिसून आला आहे. पाचही जिल्हा परिषद गटासह पंचायत समितीच्या दहापैकी आठ जिंकून भारतीय जनतापक्षाने ऐतिहासिक विजय मिळवून सेलू नगरपालिका निवडणुकीनंतर आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले आहे.
निवडणूक निकाल जाहीर करतांना सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार डॉ.शिवाजी मगर, गटविकास अधिकारी उदय जाधव, नायब तहसीलदार जयश्री कोल्हे, विजय मोरे, गजानन इनामदार, हरिष टाक आदींची प्रमुख उपस्थिती होती. निकालामध्ये भारतीय जनता पार्टीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तालुक्यातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कुपटा, वालूर आणि देऊळगाव गात या विभागांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या.
कुपटा जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार योगीता रंजीत मोरे यांनी ७,५९७ मते मिळवून शानदार विजय संपादन केला आहे. त्यांनी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचे उमेदवार प्रकाश धोंडीबा मुळे यांचा पराभव केला, ज्यांना ५,९४७ मते मिळाली. याच गटांतर्गत असलेल्या कुपटा पंचायत समिती गणातही भाजपच्या विजयमाला ग्यानोजी डोंबे ३,५७१ मते घेऊन विजयी झाल्या असून, त्यांनी राष्ट्रवादीच्या मिनाबाई सुभाषराव सोळंके (२,८९७ मते) यांचा पराभव केला. तर सोन्ना गणातून भाजपच्या सपना सुनील सावंत ३,८८८ मते मिळवून निवडून आल्या आहेत, त्यांनी राष्ट्रवादीच्या संगीता धारुजी धाबे (२,४९६ मते) यांच्यावर मात केली.
वालूर जिल्हा परिषद गटात भाजपच्या साक्षी नागेश साडेगांवकर यांनी ८,७४३ मते मिळवून मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार माधुरी राम पाटिल यांनी ५,९६४ मते घेत कडवी झुंज दिली. वालूर पंचायत समिती गणातून भाजपचे गणेश साहेबराव मुंढे ४,९४७ मते घेऊन विजयी झाले, तर राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर फालाजी रोकडे २,८९३ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले. मोरेगाव गणातही भाजपच्या द्रौपदीबाई दिलिपराव मगर ३,७२७ मते मिळवून विजयी ठरल्या, त्यांनी राष्ट्रवादीच्या रेवती तुळशीदास रोकडे (३,३०० मते) यांचा पराभव केला.
देऊळगाव गात जिल्हा परिषद गटात भाजपच्या प्रिती आशिष डख ६,९०० मते मिळवून विजयी झाल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या उर्मिला नामदेव डख (५,८३७ मते) यांचा पराभव केला. याच विभागातील देऊळगाव गात गणातून भाजपचे शिवराम माणीकराव कदम ३,७६७ मते मिळवून विजयी झाले, तर राष्ट्रवादीचे सुभाष विश्वनाथ चव्हाण २,६३० मतांसह प्रतिस्पर्धी ठरले. तिडी पिंपळगाव गणात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निर्मलाबाई विनायकराव आवटे यांनी ३,०९९ मते मिळवून भाजपच्या अजित शरद मोगल (३,०१९ मते) यांचा अवघ्या ८० मतांनी पराभव करत विजय मिळवला.
चिकलठाणा बुद्रुक जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टीचे प्रसाद भगवानराव डासाळकर ७,६४१ मते मिळवून विजयी झाले आहेत. त्यांनी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचे उमेदवार पावडे पुरुषोत्तम दत्तात्रय (६,४६९ मते) यांचा पराभव केला. तर चिकलठाणा बुद्रुक पंचायत समिती गणात नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचे उमेदवार अनिरुद्ध सुभाषराव नाईक (३,६६६ मते) विजयी झाले आहेत. त्यांनी सुंदर बाबासाहेब गाडेकर (३,४४२ मते) यांचा पराभव केला. बोरकिनी गणात भारतीय जनता पक्षाच्या सुलभाबाई ज्ञानेदव घुगे (३,०६२) यांनी विजय मिळवला असून प्रतिस्पर्धी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीच्या मनीषा अरूण आघाव (२,७५४) यांचा पराभव केला आहे. रवळगाव जिल्हा परिषद गटातून भाजपच्या डॉ.रोडगे सविता संजय या ९१२२ मते मिळवून विजयी झाल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या लहाने वर्षा राजेंद्र (६६८८ मते) यांचा पराभव केला. रवळगाव गणात भाजपच्या अश्विनी अनिल पवार ४९०२ मते घेऊन विजयी ठरल्या असून, त्यांनी राष्ट्रवादीच्या इंद्रायणी बाळासाहेब रोडगे (३०८६ मते) यांच्यावर मात केली आहे. डासाळा गणात भाजपचे प्रभाकर सुंदरराव गजमल हे ३८९८ मते मिळवून केवळ १७ मतांच्या फरकाने विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादीच्या उद्धव भगवान गजमल (३८७९ मते) यांचा पराभव केला. संपूर्ण तालुक्यात भाजपने जिल्हा परिषदेच्या पाच पैकी पाच , तर पंचायत समितीच्या १० पैकी ८ जागांवर विजय मिळविला आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला केवळ दोन जागा पदरात पाडून घेता आल्या आहेत..

निवडणूक विभागाचे टीम वर्क
ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी शोभा जाधव, सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार डॉ.शिवाजी मगर, गटविकास अधिकारी उदय जाधव यांच्यासह नायब तहसीलदार जयश्री कोल्हे, विजय मोरे, गजानन इनामदार, महसूल अधिकारी हरिश टाक, नारायण पिंपळे, रवी बंदुके, अशोक राऊत, प्रताप शेरे, शेख नूर, विजय सोंजे, विकास मुपडे, गोविंद राठोड, अमोल खेडकर, विजय टेकाळे, मिरगे, मास्टर ट्रेनर टीम प्रमुख सुनील राठोड, प्रा. महेश कुलकर्णी, गजानन साळवे, विकास मुपडे, प्रा. प्रशांत देशपांडे, प्रा. मोहन पाटील, प्रा. अजय उंडेगावकर, प्रा. अविनाश सुत्रावे, प्रा. गणेश माळवे, प्रा. घुलेश्वर, धर्मकुमार वानरे, एकनाथ जाधव, सुभाष मोहकरे, राजेंद्र होलसुरे, राजू द्यावरवार, प्रमोद रोडगे, किशोर ढोके, विलास कदम, नितीन खाकरे, राजेश राठोड, विष्णू काळे, प्रताप पवार, अनिल कदम, संजय भूमकर, पद्माकर गोंडगे, महादेव चोकनफळे, सूर्यकांत गणाचार्य, बाबासाहेब पंडीत, महाजन, नरेंद्र झाल्टे आदींसह पोलिस निरीक्षक दीपक बोरसे, पोौलिस अधिकारी व कर्मचारी तसेच निवडणूक विभाग आणि महसूल अधिकारी तसेच क्षेत्रीय अधिकारी, मतदान अधिकारी कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.






