नूतन विद्यालय शिक्षण संस्थाध्यक्ष डॉ. लोया यांची पत्रकार परिषदेत माहिती, शाळेचे नाव बदलण्याचा संस्थेला घटनात्मक अधिकार
सेलू : सरकारी शाळांनाही दानशूर व्यक्तींचे नाव देण्याचा शासनाचा निर्णय आहे. संस्थेतील घटक संस्थांचे नाव बदलण्याचा घटनात्मक अधिकार संस्थेच्या कार्यकारी मंडळाला आहे. शिक्षक कर्मचारी भरती प्रक्रिया मा. उच्च न्यायालय, खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे न्यायप्रविष्ट आहे, अशी माहिती नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम. लोया यांनी शुक्रवारी, १४ ऑगस्ट २०२६ रोजी पत्रकार परिषदेत दिली.
संस्थेमध्ये पावती न देता फीस वसुली करण्यात येत नाही. विलंब होतो, पण रितसर पावती देण्यात येते. यापुढे तत्काळ पावती देण्यात येईल, असे डॉ. लोया यांनी सांगितले. श्रीरामजी भांगडिया वसतीगृह इमारत २०१५ पासून विद्यार्थी संख्येअभावी इंग्लिश स्कूलला तात्पुरत्या स्वरुपात वर्ग भरविण्यासाठी दिलेली आहे. नूतन महाविद्यालयातील पुरेसे विद्यार्थी मिळाल्यास, वसतिगृह चालू करण्यात येईल. तसेच श्रीरामजी भांगडिया वसतीगृहावरील बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूल हे नाव काढून त्या जागी भांगडिया यांचे नाव टाकण्यात येईल.
संचालक नंदकिशोर बाहेती आणि जयप्रकाश बिहाणी यांना संस्थेच्या सर्वांगीण विकासाबद्दल अत्यंत तळमळ असून ते संस्थेच्या उत्कर्षासाठी तन-मन-धनाने कार्य करत आहेत. इंग्लिश स्कूलच्या भव्य इमारत उभारणीत तसेच सीबीएसई अभ्यासक्रम सुरू करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. बिहाणी यांच्या संयोजनात शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येत आहेत. त्यामुळे संस्थेतील शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थी संख्या वाढली आहे. संस्थेने रितसर ठराव घेऊन नियमानुसार ‘बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूल’ असा नामविस्तार केला. त्याचा सोहळाही पार पडला आहे. हे नाव आता कदापिही बदलता येणार नाही. विद्यार्थी हिताला संस्थेचे सर्वोच्च प्राधान्य असून दलितमित्र श्रीरामजी भांगडिया हे संस्थेचे श्रद्धास्थान आहेत, असे डॉ. लोया, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी म्हणाले. मकरंद दिग्रसकर, राजेश गुप्ता, मुख्याध्यापक के. के. देशपांडे आदींची उपस्थिती होती.





