विद्यार्थ्यांचा उस्फूर्त सहभाग
सेलू : गौरव सेवाभावी संस्था सेलू संचलित यासेर उर्दू प्राथमिक सेमी इंग्लिश शाळेत १ ऑगस्ट २०२६ रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त शाळेत इयत्ता चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आणि सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी सय्यद इम्रान व सय्यद अमन यांनी आयोजक म्हणून काम पाहिले, तर पठाण नजमा, खान तहेमीना व सीमा पठाण यांनी विविध गटांतील विद्यार्थ्यांच्या निबंध व सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे परीक्षण केले.कार्यक्रमा दरम्यान मुख्याध्यापक जावेद खान फेरोज खान पठाण यांनी विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याबद्दल मार्गदर्शन केले. केवळ दीड दिवस औपचारिक शिक्षण घेतलेले अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राचे महान समाजसुधारक, लोककवी आणि प्रतिभावान लेखक होते. त्यांनी ‘फकिरा’सारख्या अजरामर कादंबरीसह ३५ कादंबऱ्या, १५ कथासंग्रह, पोवाडे आणि नाटकांची निर्मिती केली, तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोलाचे योगदान दिले, अशी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शोएब अन्सारी, सय्यद झीशन, शेख इर्शाद आणि सय्यद आरेफ यांनी परिश्रम घेतले.





