सेलू : परभणी येथील ‘श्रुती संगीत विद्यालय’ चे संचालक आणि पाटबंधारे खात्याचे सेवानिवृत्त कर्मचारी यशवंतराव हरिभाऊ चारठाणकर यांना ‘पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर कला गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्या वतीने हा पुरस्कार त्यांना १८ ऑगस्ट रोजी प्रदान करण्यात आला.
मुंबई येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे पार पडलेल्या या शानदार सोहळ्यात पद्मविभूषण डॉ. सोनल मानसिंह यांच्या हस्ते चारठाणकर यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. या वेळी मंडळाचे अध्यक्ष सूर्यवंशी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. संगीत क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.या पुरस्काराबद्दल श्री. चारठाणकर यांचे विविध क्षेत्रांमधून अभिनंदन होत आहे.





