गंगाखेड तालुका काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
गंगाखेड : तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहेत. त्याचबरोबर गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे शहराला वेढा पडला असून, दोन्ही बाजूंच्या पात्रांना तलावाचे स्वरूप आले आहे. या पार्श्वभूमीवर, गंगाखेड तालुक्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून शेतकऱ्यांसह शहरातील पूरग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. शासनाने परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी १२८ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे, मात्र या यादीतून गंगाखेड तालुक्याला वगळण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आणि असंतोष निर्माण झाला आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
गंगाखेड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये तातडीची मदत द्यावी आणि गोदावरी पूरग्रस्तांनाही तातडीची मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जर ही मागणी पूर्ण झाली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही काँग्रेसने दिला आहे. यावेळी गंगाखेड तालुका आणि शहरातील नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती देण्यात आली. निवेदन सादर करतेवेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संतोष मुंडे, शहराध्यक्ष शेख युनूस, अ. जा. विभागाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर साळवे, अमानुल्ला काका, युवक काँग्रेसचे सिद्धोधन भालेराव, शिवाजी घोबाळे, वजीरभाई, रफिक शेख, जावेदभाई आदी पदाधिकारी उपस्थित होते.





