नितीन माध्यमिक विद्यालयात एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा; ४४६ विद्यार्थी सहभागी
सेलू : येथील नितीन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आहेर बोरगाव (ता. सेलू) येथे बुधवार, दिनांक २४ सप्टेंबर २०२५ पासून एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा सुरू झाली आहे. या केंद्रावर सेलू शहर आणि तालुक्यातील एकूण १६ शाळांमधील ४४६ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. परीक्षा केंद्रावर एलिमेंटरी परीक्षेचा पहिला पेपर ‘वस्तूचित्र’ आणि दुपारच्या सत्रात ‘स्मरणचित्र’ असे दोन पेपर झाले. पहिल्या दिवशी एलिमेंटरी परीक्षेसाठी २९८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ही परीक्षा २७ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षा शांततेत देता यावी यासाठी केंद्रावर बसण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, शौचालय आणि पर्यवेक्षणाची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र लहाने, डॉ. श्रीधरराव लहाने आणि मुख्याध्यापक सर्जेराव लहाने यांनी परीक्षा केंद्राला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्रप्रमुख, सह-केंद्रप्रमुख, तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.





