जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
परभणी : अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या अत्यंत गंभीर घटनेचा निषेध करण्यासाठी आणि दोषींना कठोर शिक्षा व पीडितेला न्याय मिळावा, या मागणीसाठी ‘आम्ही सेलूकर बंधू भगिनी’ आणि विविध स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने एकवटले. मंगळवारी, ७ ऑक्टोबर २०२५ रोजी सेलू येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर नागरिकांच्या वतीने शांततेत मोर्चा काढण्यात आला.
लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून सकाळी १०:३० वाजता मोर्चाला सुरुवात झाली. अत्यंत शांतपणे आणि शिस्तबद्धपणे उपजिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोर्चा धडकला. यावेळी मुख्यमंत्री यांच्याकडे, उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत एक निवेदन सादर करण्यात आले आहे. तत्तपूर्वी निवेदन सर्वांसमोर वाचण्हयात आले. तहसीलदार डॉ.शिवाजी मगर यांनी निवेदन स्वीकारले. निवेदनात नमूद केल्यानुसार, या प्रकरणातील आरोपी शिक्षक संतोष बबनराव मलसटवाड तसेच नितिन मनोज परदेशी आणि विधी संघर्ष बालक व इतरांविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात ३ ऑक्टोबर २०२५ रोजी बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ (पोक्सो) कायद्यातील तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपींपैकी एक आरोपी शिक्षक असून त्याने शिक्षकी पेशाला काळीमा फासणारे कृत्य केले आहे. सुसंस्कृत सेलू शहरात अशा घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या असून, या कृत्यांना पोलीस प्रशासनाचा धाक राहिला नाही. यामुळे सेलू व परिसरात असे अपराध घडत आहेत. प्रशासनाच्या या ढिलेपणामुळे व गुन्हेगारांवर वचक न राहिल्यामुळे सेलूतील गुन्हेगारीचे प्रमाण वाढू शकते, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. पीडितेला न्याय मिळावा आणि सेलूत अशा घटना पुन्हा होऊ नयेत, या उद्देशाने हा मोर्चा काढण्यात आला असून, सदरील प्रकरण जलद गती न्यायालयात व खटला न्याय चौकशी अधीनकैदी म्हणून चालविण्यात यावा. या प्रकरणात सरकारतर्फे विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात यावी. तपास एसआयटी (विशेष तपास पथक) मार्फत करण्यात यावा. पीडितेला तिच्या पुढील भविष्यासाठी आर्थिक मदत देण्यात यावी. प्रकरणातील आणखी फरार आरोपीस तात्काळ अटक करण्यात यावी. पीडिता व तिच्या कुटुंबियांना संरक्षण देण्यात यावे. या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात; अन्यथा लोकशाही मार्गाने न्याय हक्कासाठी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
सुन्न वातावरणात समाजमन ढवळून निघाले
या गंभीर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून सेलू शहरातील वातावरण सुन्न झाले असून, समाजमन ढवळून निघाले आहे. नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. रविवारी सायंकाळी श्री केशवराज बाबासाहेब मंदिर सभागृहात जागरूक नागरिकांनी बैठक घेत घटनेचा तीव्र निषेध केला. याप्रकरणातील तीन आरोपी सध्या पोलिस कोठडीत असून एका फरार आरोपीचा पोलिसाचे विशेष पथक शोध घेत आहे. दरम्यान, घटनेच्या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी, आरोपीला भेटायला जाणार्या एका शिक्षकाच्या तोंडावर ६ ऑक्टोबर रोजी शाई फेकून संताप व्यक्त केल्याचा प्रकार घडला.





