अमृत अभियानांतर्गत परभणी शहर विकासाला नवे बळ
परभणी : केंद्र सरकारच्या अमृत २.० अभियानांतर्गत परभणी महानगरपालिकेच्या तब्बल ५६५.९४ कोटींच्या पायाभूत प्रकल्पांना अंतिम प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामध्ये ४०८.८३ कोटींचा मलनि:स्सारण प्रकल्प आणि १५७.११ कोटींचा पाणीपुरवठा प्रकल्प समाविष्ट असून नगरविकास विभागाने यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
या मंजुरीमुळे परभणी शहरातील जलपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापन यामध्ये मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले की, मंजूर प्रकल्पांमुळे शहराच्या पायाभूत सुविधांना मजबुती मिळून नागरिकांना शुद्ध व सातत्यपूर्ण पाणीपुरवठा मिळणार आहे. आधुनिक भूमिगत गटार व्यवस्था उभारल्याने सांडपाणी व्यवस्थापन सक्षम होईल आणि पर्यावरणीय प्रदूषणातही घट होईल.मलनि:स्सारण प्रकल्पात केंद्राचा १३६.२६ कोटी, राज्याचा १४९.९१ कोटी आणि स्थानिक संस्थेचा १२२.६४ कोटी असा वाटा तर पाणीपुरवठा प्रकल्पात केंद्राचा ५२.३६ कोटी, राज्याचा ५७.६१ कोटी आणि स्थानिक संस्थेचा ४७.१३ कोटी असा निधी प्रस्तावित आहे.या दोन्ही प्रकल्पांच्या अंमलबजावणीमुळे परभणीचे शहरी आरोग्य, पर्यावरणीय गुणवत्ता आणि भविष्यातील जलव्यवस्थापन क्षमता लक्षणीयरीत्या उंचावणार असून शहर विकासाला नवी दिशा मिळणार आहे.





