पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची प्रतिक्रिया
परभणी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२६–२७ चा १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला. विकसित भारताचा हा अर्थसंकल्प देशातील प्रत्येक घटकाचा विचार करणारा, सर्वसमावेशक आणि दूरदृष्टी असलेला आहे, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली आहे.
शेतकरी, कामगार, मध्यमवर्ग, महिला, युवक, उद्योजक, स्टार्टअप्स तसेच वंचित घटकांना केंद्रस्थानी ठेवून या अर्थसंकल्पाची रचना करण्यात आली आहे. पायाभूत सुविधा, उच्चगती रेल्वे, रस्ते विकास, उद्योग-व्यवसाय, रोजगारनिर्मिती, आरोग्य, ऊर्जा आणि महिला सक्षमीकरण या सर्व क्षेत्रांना भक्कम पाठबळ देणारा हा अर्थसंकल्प आहे, असे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देश आज प्रगतीपथावर असून, हा अर्थसंकल्प ‘विकसित भारत’ या संकल्पनेला अधिक वेग देणारा आहे.
महिला मंत्री म्हणून सांगताना मला विशेष अभिमान वाटतो की या अर्थसंकल्पात महिलांना लाभार्थी म्हणून नव्हे, तर देशाच्या विकासातील भागीदार म्हणून केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. महिला सक्षमीकरणासाठी शिक्षण, कौशल्यविकास, स्वयंरोजगार, स्टार्टअप्स, सुरक्षित वाहतूक, आरोग्य आणि आर्थिक स्वावलंबन अशा सर्वांगीण तरतुदी करण्यात आल्या आहेत.युवकांसाठी रोजगारनिर्मिती, उद्योगांना चालना, स्टार्टअप इकोसिस्टीम, शेतकऱ्यांसाठी भरीव निधी, ग्रामीण व शहरी भागात रस्ते, रेल्वे, ऊर्जा आणि आरोग्यसेवा मजबूत करण्यावर अर्थसंकल्पात स्पष्ट भर देण्यात आला आहे.
मध्यमवर्गाला दिलासा देणाऱ्या तरतुदी असो किंवा वंचित घटकांसाठीच्या योजना, हा अर्थसंकल्प देशातील सगळ्यांना सोबत पुढे घेऊन जाणारा आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आज प्रगतीपथावर पुढे जात आहे. देशाच्या प्रगतीसोबत महाराष्ट्रालाही वेग देणारा हा अर्थसंकल्प आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार या सर्व तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करून महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर नेईल, याचा मला पूर्ण विश्वास आहे.





