मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर; १६ गंभीर जखमींवर उपचार सुरू; युद्धपातळीवर बचावकार्य
परभणी : मानवत तालुक्यातील यशवाडी येथील प्रसिद्ध त्रिमूर्ती हनुमान मंदिरात सुरू असलेल्या सभामंडपाच्या निर्माणाधीन बांधकामाच्या छताचे दगडी खांब शनिवारी, २० जूनरोजी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. सायंकाळी आठ वाजेपर्यंत जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त अधिकृत माहितीनुसार या दुर्घटनेत पाच भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर १६ गंभीर जखमी भाविकांवर उपचार सुरू आहेत.
मानवत-परभणी राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हा शिवारात असलेल्या यशवाडी येथील प्रसिद्ध त्रिमूर्ती हनुमान मंदिराला परिसरात विशेष धार्मिक महत्त्व असून दर शनिवारी विविध जिल्ह्यांतून हजारो भाविक येथे दर्शन, कीर्तन आणि महाप्रसासाठी येत असतात. सध्या मंदिर परिसरात गाभारा व सभामंडपाच्या विस्ताराचे काम युद्धपातळीवर सुरू होते. या बांधकामात मोठ्या प्रमाणावर दगडांचा वापर करण्यात येत होता. छताला आधार देण्यासाठी लाकडी फळ्या व खांब टेकविले आहेत. नेहमीप्रमाणे शनिवारी दर्शनासाठी मोठी गर्दी झालेली होती. दुपारी तीनच्या सुमारास दोन रांगा लावून भाविक दर्शन घेत असताना अचानक छताचा संपूर्ण भाग लाकडी खांबांसह अचानक भाविकांच्या अंगावर कोसळला. विशेषतः दगडी बांधकामाचा भाग भाविकांवर पडल्याने ढिगाऱ्याखाली १५ ते २० भाविक दबल्याने गंभीर जखमी झाले. दरम्यान, या दुर्घटनेत पाच भाविकांचा जागीच मृत्यू झाला गंभीर जखमींवर जिल्हा रुग्णालयात तसेच आर.पी. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.घटना घडताच उपस्थित भाविकांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले. मानवत, परभणी, सेलू आणि पाथरी येथून रुग्णवाहिका तसेच वैद्यकीय पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. जखमींना उपचारासाठी परभणी येथील विविध रुग्णालयांत हलविण्यात येत असून प्रशासनाकडून मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून प्रशासनाकडून अधिक तपास सुरू आहे. घटनास्थळी जिल्हा, पोलिस प्रशासनाच्या अधिकार्यांनी घेतली असून बचाव कार्य वेगाने सुरू होते. ढिगारा उपसण्यासाठी ५ जेसीबी मशीन आणि ५० हून अधिक रूगणवाहिकांद्वारे जखमींना उपचारासाठी हलविण्यात आले.
मृतांची नावे : संतोष गडदे (रा.पांगरा ता.मंठा) आकाश सुरदोसे (गंगाखेड रोड परभणी), नुमेश अग्रवाल (जिंतूर), सुरज कोपरटकर (इटाळी), श्रीकृष्ण बलभीम गवारे (रा. चिंचवडगाव ता. वडवणी)
जखमी भाविकांची नावे : अनिकेत संतोष गडदे (पांगरा ता. मंठा), हनुमंत लिपने (बोरगाव), प्रविण प्रकाश राजबिडे, नारायण दौलत खरात (जवळा), दादाराव नागोजी भांगे (जवळा), रामकृष्ण बदाडे (माजलगाव), परमेश्वर कुंडलीक राऊत (लोणी), केशव गिरी (देऊळगाव अवचार), नागेश विठ्ठल इक्कर (कुंभारी), प्रविण रघुनाथ हलगे (सेलू), ओंकार मारोती कोपर्तेकर (निटाळी), सौरभ गजानन कोथळकर (केकर जवळा), ऋषिकेश कोपर्तेकर- (निटाळी), रामा घुगे (नागर जवळा), रामेश्वर बोंडे (चिंचोली) आणि धनंजय बोचरे (कुंभारी बाजार)
लोकप्रतिनिधींची घटनास्थळी धाव : घटनास्थळी आमदार राजेश विटेकर, आमदार रत्नाकर गुट्टे, माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी धाव घेऊन घेतली. ही घटना केवळ एक अपघात नसून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी धार्मिक स्थळांच्या सुरक्षिततेबाबत अधिक दक्षता घेण्याची तीव्र गरज अधोरेखित करणारी आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, असे नमूद करून आमदार राजेश विटेकर यांनी दिवंगत भाविकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली असून जखमी भाविक लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना केली आहे.
जिल्हाधिकारी चव्हाण तातडीने घटनास्थळी
या दुर्घटनेची माहिती मिळताच परभणीचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी आपले सर्व नियोजित दौरे तातडीने रद्द करून थेट घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दुर्घटनास्थळाची बारकाईने पाहणी करत सुरू असलेल्या तांत्रिक बचावकार्याचा आढावा घेतला. ढिगाऱ्याखालून काढण्यात येणाऱ्या प्रत्येक जखमी नागरिकाला एका सेकंदाचाही विलंब न लावता तातडीने सर्वोत्तम वैद्यकीय उपचार उपलब्ध करून द्यावेत, असे कडक निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल, आरोग्य आणि जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेला दिले.अप्पर पोलीस अधीक्षकांसह मानवत आणि परभणी शहरातून अतिरिक्त पोलीस फौजफाटा तसेच दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
यशवाडी येथे मंदिरासमोरील सभा मंडप कोसळल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या भाविकांच्या कुटुंबियांचा दुःखात सहभागी आम्ही सहभागी आहोत. जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, तहसील, आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांशी संपर्क साधून बचावकार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहेत. जखमींना तातडीने उपचार मिळवून देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. – मेघना साकोरे-बोर्डीकर, पालकमंत्री
मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मृत भाविकांना श्रद्धांजली
परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथील हनुमान मंदिरातील घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स वर पोस्ट करून तीव्र दु:ख व्यक्त केले असून, मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल, असे जाहीर केले आहे.परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथे हनुमान मंदिराच्या निर्माणकार्य सुरु असलेल्या छताचा भाग कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेत काही भाविकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेतील जखमींवर उपचार केले जात आहेत. स्थानिक प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी असून मदत आणि बचावकार्य सुद्धा वेगाने सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.





