वाशिमच्या कलाकारांनी नवी दिल्लीत सादर केली महाराष्ट्राची पारंपरिक लोककला
वाशिम (फुलचंद भगत) : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा आणि सांस्कृतिक वारशाचा गौरव वाढवणारी अभिमानास्पद कामगिरी वाशिम जिल्ह्यातील कलाकारांनी केली आहे. राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत विष्णू अशोक धोंगडे आणि प्रताप भगवान शिंदे यांनी ‘गोंधळ’ या पारंपरिक लोककलेचे सादरीकरण केले.
देशाच्या राजधानीतील राष्ट्रपती भवनासारख्या प्रतिष्ठित ठिकाणी महाराष्ट्राची पारंपरिक लोककला सादर करण्याचा मान मिळणे ही वाशिम जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. या सादरीकरणातून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीची परंपरा, भक्तीभाव आणि लोककलेचे वैभव देशाच्या सर्वोच्च सांस्कृतिक व्यासपीठावर पोहोचले. श्री. कालिंका माता गोंधळ लोककला संच, जाभरून परांडे/ भेरा यांच्या माध्यमातून गोंधळ लोककलेची परंपरा जपण्याचे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले जात आहे. पारंपरिक वाद्यांच्या साथीने सादर होणाऱ्या या लोककलेला राष्ट्रपती भवनात मिळालेला मान कलाकारांसाठी विशेष प्रेरणादायी ठरला.या उल्लेखनीय सादरीकरणाबद्दल विष्णू अशोक धोंगडे व प्रताप भगवान शिंदे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या या कामगिरीमुळे जांभरूण परांडे,भेरा गाव, वाशिम जिल्हा आणि महाराष्ट्राच्या लोककलेचा गौरव झाला आहे.





