माजी आमदार विजय भांबळे यांची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी; पीक विम्यासह सरसकट आर्थिक मदतीचा आग्रह
देशनिष्ठ प्रतिनिधी, जिंतूर : जिंतूर व सेलू तालुक्यांत पावसाचा मागील दोन महिन्यांहून अधिक काळ मोठा खंड पडल्यामुळे खरीप पिके पूर्णपणे सुकण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे नुकसानीचे कोणतेही जाचक पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी, तसेच मागील वर्षाचा व चालू वर्षाचा पीक विमा तात्काळ वितरित करून जिंतूर व सेलू तालुके कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करावेत, अशी मागणी माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिंतूरचे तहसीलदार यांना शुक्रवारी, ४ सप्टेंबर २०२६ रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी कृषी अधिकारी घुगे आणि पुरवठा विभागाचे होळंबे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिंतूर तालुक्यात चालू वर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला समाधानकारक पावसाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कर्ज काढून व उसनवारी करून सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, हळद, ऊस, कांदा, राजमा आणि फळबागांची मोठ्या कष्टाने पेरणी केली होती. मात्र मागील दोन महिन्यांहून अधिक काळ पावसाने ओढ दिल्याने कडक उन्हामुळे शेतातील पिके मान टाकून करपून गेली आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजा तीव्र आर्थिक व मानसिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानीचे पारंपरिक व जाचक अटींचे पंचनामे करण्यात वेळ न घालवता जिंतूर व सेलू तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना पिकांसाठी सरसकट हेक्टरी २५ हजार रुपये तर फळबागांसाठी हेक्टरी ४० हजार रुपये तातडीने खात्यात जमा करावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.तसेच मागील वर्षाच्या (खरीप व रब्बी) पीक विम्याची रक्कम अद्यापही अनेक पात्र शेतकऱ्यांना मिळालेली नाही. प्रशासनाने विमा कंपन्यांना आदेश देऊन ही प्रलंबित रक्कम तात्काळ जमा करावी. यासोबतच चालू हंगामात पावसाने मोठा दगा दिल्याने चालू वर्षाचा खरीप पीक विमा तातडीने मंजूर करून अंतरिम मदत म्हणून अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना वितरित करावी, असा आग्रह धरण्यात आला. जिंतूर व सेलू दोन्ही तालुके तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे, तसेच बँक कर्ज वसुलीस स्थगिती देऊन सर्व शासकीय सवलती लागू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने या मागण्यांची दखल घेऊन तातडीने शासन दरबारी पाठपुरावा करावा, अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही माजी आमदार विजयराव भांबळे यांनी दिला.या निवेदनावर माजी आमदार विजयराव भांबळे, तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव बुधवंत, जिल्हा परिषद सदस्य अजयराव चौधरी, माणिकराव हरकळ, शंकरराव जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ राठोड, बाळासाहेब घुगे, विठ्ठलराव घोगरे, पंचायत समिती सदस्य नंदकिशोर अंभूरे, अविनाश मस्के, मुजाहेद कादरी, राहुल कणकुटे, माजी सभापती मधुकरराव भवाळे, गणेशराव इलग, शरद अंभूरे, विजय खिस्ते, नगरसेवक जाबेर भाई, करीम लाला, माजी नगरसेवक मनोहर डोईफोडे, आहेमद बागबान, शाहेद बेग मिर्झा यांच्यासह सरपंच कवडा राजेश चव्हाण, माधव घोगरे, सुधारक मस्के, राहुल घुले, अभिजित भांबळे, शौकत लाला, खयुम कादरी, सुलेमान सिद्धिकी, अक्कू भाई, जगदीश शेंद्रे, सुरेश सानप, जिवन भवरे, शेख जलील, दिनकर सातपुते, ज्ञानेश्वर काळे, गुलाबराव सानप, रामेश्वर गायकवाड, रोहिदास राठोड, ॲड. कपिल निकम, नयुम कादरी, अब्दुल मुखीद, विश्वंभर पडघन, अशोक प्रधान, पंडित जाधव, धर्मा राठोड, श्रीराम जाधव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





