
महापूजा, होमहवन, महाआरती, ध्वज मिरवणूक व महाप्रसादाचे आयोजन; १२ सप्टेंबरला दहीहंडी व काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम
वाशिम : मंगरुळपीर तालुक्यातील पाटरवा येथील शासनमान्य तीर्थक्षेत्र व निसर्गरम्य, जागृत व प्राचीन देवस्थान असलेल्या श्री भवानी माता (श्री जगदंबा देवी) तिर्थक्षेत्रात शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीच्या दर्शनाचा व महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
यात्रा महोत्सवाच्या दिवशी सकाळी ९ वाजता महापूजा, होमहवन व महाआरती होणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता ध्वज मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक वातावरणात निघणाऱ्या या मिरवणुकीत परिसरातील भाविक, महिला मंडळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.यानंतर दुपारी १२ वाजल्यापासून भाविकांच्या आगमनापर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या निमित्ताने विविध गावांमधून येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून, या धार्मिक उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.*भक्तिगीतांचा कार्यक्रमही रंगणार*यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने शुक्रवार दि. ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत भक्तिगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातून भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून, भाविकांना धार्मिक व सांस्कृतिक मेजवानी अनुभवता येणार आहे.१२ सप्टेंबरला दहीहंडी व काल्याचे कीर्तन.यात्रा महोत्सवाची सांगता शनिवार, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी होणाऱ्या विशेष धार्मिक कार्यक्रमांनी होणार आहे. यावेळी दहीहंडी व गोपाळकाला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ह.भ.प. श्री दत्तात्रय रोकडे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाचे आयोजन शनिवार सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. या कीर्तनाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.*महिला मंडळांचा विशेष सहभाग*यात्रा महोत्सवाच्या आयोजनात परिसरातील विविध देवसेवाधारी महिला मंडळांचा विशेष सहभाग आहे. श्री जगदंबा सेवाधारी महिला मंडळ पारवा, बोरव्हा खुर्द व लखमापूर; स्वामी समर्थ सेवाधारी महिला मंडळ,राजगाव; जय भवानी सेवाधारी महिला मंडळ, इचा; शिवपार्वती सेवाधारी महिला मंडळ, नागी; मंगरुळपीर महाराज सेवाधारी महिला मंडळ, चकवा; ज्ञानेश्वर माऊली सेवाधारी महिला मंडळ, तपोवन; जय गजानन सेवाधारी महिला मंडळ, चिखलगाव; श्री गजानन सेवाधारी महिला मंडळ, शिंगडोह; जय जगदंबा सेवाधारी महिला मंडळ, अजनी; जय गजानन सेवाधारी महिला मंडळ, पोहा; लक्ष्मी महाराज सेवाधारी महिला मंडळ, किन्ही रोकडे; जय गजानन सेवाधारी महिला मंडळ घोटा तसेच नवनाथ महाराज सेवाधारी महिला मंडळ, खडी आदी मंडळांचा सहभाग राहणार आहे.श्री भवानी माता (श्री जगदंबा देवी) तिर्थक्षेत्र, समस्त गावकरी मंडळी व ग्रामपंचायत पारवा, बोरव्हा खुर्द, लखमापूर यांच्या वतीने या भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविणाऱ्या या यात्रा महोत्सवासाठी परिसरातील भाविकांनी ११ व १२ सप्टेंबर रोजी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पारवा,बोरव्हा,लखमापुर येथील आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
वार्तांकन : फुलचंद भगत, वाशिम





