सेलू तालुका पत्रकार संघाची मागणी, पोलिस निरीक्षकांना दिले निवेदन; शिविगाळ व धमकीचा जाहीर निषेध
सेलू | प्रतिनिधी : पत्रकारांना शिविगाळ करणाऱ्या व जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत तात्काळ कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन सेलू पोलीस निरीक्षक यांना शनिवारी, २७ जून २०२६ रोजी देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, पत्रकारांवर दिवसेंदिवस हल्ले होत असून आता लोकप्रतिनिधीही पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी देत आहेत. ही लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांनी मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना शिवराळ भाषेचा वापर करून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार लोकशाहीला काळीमा फासणारा आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर जर लोकप्रतिनिधी अशा प्रकारे वागत असतील तर ही अत्यंत निंदनीय बाब आहे. खासदार संजय दिना पाटील यांच्या या कृत्यानंतर राज्यभरातील पत्रकारांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.घडलेल्या या घटनेचा जाहीर निषेध करत सेलू तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने सेलू पोलीस निरीक्षक अरुण नागरे यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी तालुका अध्यक्ष लक्ष्मण बागल, सचिव शेख मोहसीन अहमद, सरचिटणीस मोहम्मद ईलीयास, ज्येष्ठ पत्रकार कांचन कोरडे, पुनमचंद खोना, अबरार बेग, निसार पठाण, संजय मुंढे, अजगर पठाण, अल्ताफ खान मास्टर, डिजिटल मीडियाचे अध्यक्ष गणेश सवणे, सदस्य सतीश आकात, दीपक जडे आणि नीरज लोया आदी उपस्थित होते.





