भिवंडीत झाली प्रश्नपत्रिका लीक; २८ जून रोजी होणार होती परीक्षा
परभणी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण १०२८ केंद्रांवर शिक्षक पात्रता परीक्षा (TET) घेण्याचे प्रस्तावित होते. ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
नीट (NEET) २०२६ च्या परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन परीक्षा परिषदेच्या वतीने सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना देखील करण्यात आलेल्या होत्या.परंतु, दिनांक २७ जून २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी येथे काही इसमांकडे या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचे समजले. या माहितीच्या आधारे भिवंडी पोलिसांनी तातडीने संबंधित ठिकाणी धाड घातली. यानंतर पुढील तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत सदर इसमांकडे शिक्षक पात्रता परीक्षा जून २०२६ च्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आले असून याप्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.सदर गंभीर परिस्थिती लक्षात घेता दिनांक २८ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्ण पारदर्शकपणेच व्हावी हा परीक्षा परिषदेचा आग्रह असल्याने व याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे वाटत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेबाबतची पुढील अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी जाहीर प्रकटनाद्वारे कळविले आहे.






