तपासणी समितीचा मोठा निर्णय
सेलू : सेलू नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ११ मधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अन्वर खान दिलावर खान पठाण यांना अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या एका महत्त्वपूर्ण निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे. अन्वर खान पठाण यांनी ‘तडवी भिल्ल’ जातीचे प्रमाणपत्र लबाडीने आणि वस्तुस्थिती लपवून मिळवल्याचे सिद्ध झाल्याने, सदर जात प्रमाणपत्र रद्द करून जप्त करण्याचा स्पष्ट लेखी आदेश जारी केला.
या आदेशावर सुजाता गायकवाड (संशोधन अधिकारी तथा सदस्य), सुरेश रामटेके (उपसंचालक तथा सदस्य सचिव), सुरेश वानखेडे (सहआयुक्त तथा उपाध्यक्ष) यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. जात प्रमाणपत्रच रद्द ठरवल्यामुळे अन्वर खान पठाण यांचे नगरसेवकपद आता धोक्यात आले असून, प्रभाग क्रमांक ११ मधील या रिक्त होऊ शकणाऱ्या पदाबाबत पुढील प्रशासकीय व कायदेशीर हालचाली काय होतात, याकडे लक्ष लागले आहे.




