सेलू : शहरात आषाढी एकादशी यंदाही भक्तिमय वातावरणात उत्साहाने साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आदी संतांच्या आकर्षक वेशभूषा साकारत वारकरी परंपरेचे दर्शन घडविले. वारकरी बालकांना क्रांती चौक येथे फराळाचे वाटप करण्यात आले.
नगरसेवक तथा गटनेते पवन आडळकर व मित्रमंडळाच्या वतीने आयोजित या उपक्रमास नगरसेवक मिलिंद पवार, संभाजी पवार, अमजद बागवान, अन्वर खान, विनोद तरटे, सचिन राऊत, नृसिंह हरणे, गजानन ताठे, सुदर्शन शेरे आदी उपस्थित होते.यानिमित्त अभंग गायन, भजन, हरिपाठ, दिंडी सोहळा, पालखी मिरवणूक तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात विद्यार्थ्यांनी दिंडी काढून आषाढी एकादशीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले.यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व पटवून देत संतांच्या विचारांचे आचरण जीवनात करण्याचे आवाहन केले. या उपक्रमांमुळे शाळांमध्ये भक्ती, संस्कार आणि वारकरी परंपरेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला





