सेलू तालुका दबाव गटाचे अधीक्षक अभियंत्यांना निवेदन, रस्ता रोको आंदोलनास पाठिंबा
सेलू : तालुक्यातील मोरेगाव ते वालूर या रस्त्याचे काम गेल्या आठ महिन्यांपेक्षा अधिक काळापासून रखडलेले असून, ते अद्याप पूर्ण झालेले नाही. या १२ किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर झालेल्या पुलांचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून, रस्ता पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी सुरू होण्यापूर्वीच पुलांना तडे गेले आहेत. संबंधित ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गाच्या मनमानी व बेजबाबदार कारभारामुळे हा रस्ता रखडला असून, या कामावर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही, असा गंभीर आरोप सेलू तालुका दबाव गटाच्या वतीने करण्यात आला आहे. या संदर्भातील एक सविस्तर मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम मंडळाचे (नांदेड) अधीक्षक अभियंता यांना देण्यात आले आहे.
ठेकेदाराने अनेक महिन्यांपासून रस्ता उखडून ठेवल्यामुळे हातनूर, रायपूर, साळेगाव आणि खेर्डा या गावांतील नागरिकांना शहरात येण्यासाठी जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे गेल्या काही महिन्यांत अनेक अपघात झाले असून, यामुळे एखाद्या नागरिकाला जीव गमवावा लागण्याची किंवा अपंगत्व येण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या खरीप हंगाम सुरू होत असल्याने या भागातील शेतकरी वर्गाला खते व बियाण्यांची वाहतूक करावी लागणार आहे. अशा दयनीय रस्त्यामुळे जर कोणतीही दुर्घटना घडली, तर त्याला संबंधित ठेकेदार आणि अधिकारी जबाबदार राहणार का, असा सवाल निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे.
केवळ १२ किलोमीटर रस्त्यासाठी ८ महिने लागणे हे देशातील एकमेव आश्चर्यकारक उदाहरण असावे, अशी टीका करत दबाव गटाने तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सुरू असलेल्या इतर रस्त्यांच्या कामांचीही हीच अवस्था असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात अधीक्षक अभियंत्यांनी तात्काळ लक्ष घालून गुणवत्ता नियंत्रण पथकामार्फत (क्वालिटी कंट्रोल) या कामाची गुणवत्ता आणि स्थळ पाहणी करावी, तसेच निविदेनुसार काम करून घेत संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी आणि त्याला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
या रखडलेल्या कामाचा निषेध करण्यासाठी आणि भागातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी १८ जून रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून, या आंदोलनाला सेलू तालुका दबाव गटाने जाहीर पाठिंबा दिला आहे. या निवेदनावर निमंत्रक ॲड. श्रीकांत वाईकर, ईसाक पटेल, ओमप्रकाश चव्हाळ, सतीश काकडे, लक्ष्मण प्रधान, मुकुंद टेकाळे, गुलाब पोळ, महादेव लोंढे, रामचंद्र कांबळे, भारत झाल्टे, अक्षय बुरे, आबासाहेब भुजबळ, नारायण पवार, उद्धव सोळंके, भारत रवंदळे, दत्ता कांगणे, राजेंद्र केवारे, सुभाष काकडे, ॲड. देवराव दळवे, विकास गादेवार, अजित मंडलिक, ॲड. योगेश सूर्यवंशी, दत्ता गायके, ॲड. रामेश्वर शेवाळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.





