जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची गावात बैठक; प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन
वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील पांगरी महादेव हे गाव गेल्या अनेक वर्षांपासून स्वतंत्र ग्रामपंचायतीअभावी विविध शासकीय योजना व मूलभूत सुविधांपासून वंचित राहिले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शुक्रवारी (४) पांगरी महादेव येथे सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची व ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेण्यात आली. गावातील प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेत त्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी राम काळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
गट ग्रामपंचायतीचे विभाजन झाल्यानंतर सन २००४ पासून पांगरी महादेवला स्वतंत्र ग्रामपंचायत मिळणे आवश्यक होते. मात्र, स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात न आल्याने गावाला अनेक शासकीय योजनांचा अपेक्षित लाभ मिळू शकला नाही. गावातील ही परिस्थिती सामाजिक कार्यकर्ते किशोर देशमुख यांनी जिल्हाधिकारी वाशीम यांच्या निदर्शनास आणून दिली होती.यापूर्वी उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची ग्रामस्थांसमवेत बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी घरांच्या नमुना ८-अ नोंदी, घराचा ८-अ उतारा, घरकुल मंजुरी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापनेच्या दृष्टीने कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.प्रशासनाच्या या कार्यवाहीमुळे ग्रामस्थांमध्ये विश्वास निर्माण झाला. त्यानंतर उर्वरित प्रश्न सोडवून गावाच्या विकासाला गती देण्यासाठी पुन्हा बैठक घेण्याची मागणी किशोर देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ८ जून २०२६ रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांना सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्याच अनुषंगाने शुक्रवारी पांगरी महादेव येथे ही बैठक घेण्यात आली.*या प्रश्नांवर झाली चर्चा*बैठकीत वनहद्दीतील शेतरस्ते, वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण, पिण्याच्या पाण्यासाठी नवीन विहीर व पाइपलाइन, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्याची सुधारणा, साईडपट्टी भरणे, समृद्धी महामार्गाखालून जाणारा रस्ता सरळ करणे, शेतकऱ्यांना सौरपंप उपलब्ध करून देणे, पीएम सूर्यघर योजनेचा लाभ घरकुलधारकांना मिळवून देणे आदी प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करण्यास मार्गदर्शन करणे, धान्य योजना, पेन्शन योजना, जात प्रमाणपत्र वाटप, गावातील वीज समस्या सोडविणे, सौरपंप योजना राबविणे तसेच पांगरी महादेव गावाला राष्ट्रीयीकृत बँकेशी जोडण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबतही चर्चा झाली.शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामस्थांना बँकिंग सुविधा उपलब्ध होणे आवश्यक असल्याने लीड बँक व्यवस्थापकांना पत्र देण्यात येईल, असे उपविभागीय अधिकारी राम काळे यांनी यावेळी सांगितले.*गावाचा विकास ही सर्वांची जबाबदारी*ग्रामपंचायत नसल्यामुळे गावाच्या विकासासाठी उपलब्ध होणाऱ्या विविध निधीचा अपेक्षित वापर होऊ शकला नाही. त्यामुळे पांगरी महादेवच्या नागरिकांना शासकीय योजना व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येक विभागाने आपल्या योजना व कर्तव्याच्या माध्यमातून गावाच्या विकासात योगदान द्यावे, अशा सूचना उपविभागीय अधिकारी राम काळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.बैठकीनंतर सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी गावात फेरफटका मारून प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. गावातील मूलभूत सुविधांची कमतरता व विकासाची गरज अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष अनुभवली. पांगरी महादेवचा विकास करण्यासाठी प्रशासनाकडून सकारात्मक कार्यवाही केली जाईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.*“प्रत्येक लाभार्थ्याला योजनेचा लाभ मिळावा”*गावातील साक्षर-निरक्षर नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी व तरुणांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देताना प्रशासनाच्या प्रत्येक विभागाचे कार्य प्रत्यक्ष दिसले पाहिजे. पांगरी महादेवच्या विकासासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते किशोर देशमुख यांनी बैठकीचे सूत्रसंचालन करताना व्यक्त केली.या बैठकीस उपविभागीय अधिकारी राम काळे, गटविकास अधिकारी श्रीमती कारले, कृषी विस्तार अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बारड, वन विभागाचे कर्मचारी, महावितरणचे शाखा अभियंता, घरकुल योजनेचे विस्तार अधिकारी, तऱ्हाळा ग्रामपंचायतीचे अधिकारी पिंपळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पांगरी महादेव येथील महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक, शेतकरी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.
वार्तांकन – फुलचंद भगत, वाशिम





