शेलूबाजार येथील मंदिराची रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक सजावट; भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथील श्री साई श्रद्धा मंदिरात गुरुपौर्णिमेचा उत्सव भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उत्सवानिमित्त मंदिराला विविध रंगांच्या फुलांच्या माळांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती.
पहाटे श्री साईबाबांच्या मूर्तीचा विधीवत अभिषेक, पूजन आणि आरती करण्यात आली. दिवसभर साईनामाचा जप, भजन-कीर्तन व विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. शेलूबाजारसह परिसरातील हजारो भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती. दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.मंदिर समिती व स्वयंसेवकांनी केलेल्या नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे हा उत्सव अत्यंत शांततेत व आनंदी वातावरणात पार पडला. साईबाबांचा “सबका मालिक एक” हा संदेश समाजात बंधुभाव आणि मानवतेची शिकवण देणारा असल्याचे भाविकांनी सांगत सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.




