परभणी जिल्ह्यातील सात नगरपालिकांच्या निवडणुकीची रविवारी मतमोजणी
समर्थकांची धाकधूक वाढली, उमेदवारांचा जीव टांगणीला
परभणी : जिल्ह्यातील सात नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया दोन डिसेंबर रोजी उत्साहात पार पडली. निकाल लांबणीवर पडल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला होता. परंतु रविवारी, २१ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सात नगराध्यक्ष आणि १६५ नगरसेवक पदाच्या निवडणुकीतील ६५२ उमेदवारांसह पालिकांच्या सत्तारोहणाचा फैसला होणार आहे. याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर लढतीतील प्रमुख पक्षांचे नेते, उमेदवार आणि कार्यकर्त्यांकडून विजयाच्या दाव्या प्रतिदाव्यांचे विविध माध्यमांवरील ‘सोशल ट्रेंड’ पुन्हा चर्चेत आले आहेत.
समर्थकांची धाकधूक वाढली
जिल्ह्यातील गंगाखेड, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, पूर्णा, सोनपेठ या सात नगरपालिकांतील ७ नगराध्यक्ष आणि १६२ सदस्य पदासाठी दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. निकाल अवघ्या दोन दिवसांवर निकाल येऊन ठेपल्याने उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची धाकधूक कमालीची वाढली आहे. या निवडणुकीत सात नगराध्यक्षपदासाठी ५० उमेदवार नशीब आजमावत आहेत, तर १६२ सदस्य पदाच्या जागांसाठी ६०२ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण ६५२ उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला आता काही तासांतच स्पष्ट होणार असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.
वाढलेल्या मतदानावर तर्कवितर्क
जिल्ह्यातील सातही नगरपालिकांमध्ये सरासरी ७२.५५ टक्के इतके विक्रमी मतदान झाले आहे. यामध्ये सोनपेठमध्ये सर्वाधिक ७८.१० टक्के, पाथरीत ७७.३४ टक्के आणि मानवतमध्ये ७३.५९ टक्के मतदान झाले आहे. त्यापाठोपाठ जिंतूरमध्ये ७२.५० टक्के, गंगाखेडमध्ये ७१.८४ टक्के आणि पूर्णा येथे ७०.३४ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सेलू नगरपालिकेत ६७.७१ टक्के मतदान झाले असून, या वाढलेल्या टक्केवारीमुळे राजकीय गोटात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मतदानाचा टप्पा पूर्ण होताच नेतेमंडळी, पक्षाचे सूत्रधार आणि उमेदवारांनी विजयाचे दावे-प्रतिदावे करण्यास सुरुवात केली आहे. काही उत्साही कार्यकर्ते आणि समर्थकांच्या निकालाच्या अंदाजाचे ट्रेंड मनोरंजकपणे चर्चेत आहेत.
नेत्यांचे दावे – प्रतिदावे
पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रामप्रसाद बोर्डीकर यांनी जिंतूर, सेलू आणि गंगाखेडमध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार राजेश विटेकर यांनी सोनपेठ आणि मानवतमध्ये हमखास विजयाचा दावा ठोकला आहे. पाथरी या आपल्या बालेकिल्ल्यात माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी पुन्हा वर्चस्व राखण्याची खात्री दिली आहे, तर शिवसेना शिंदे गट व अन्य दिग्गजांनी सत्तापरिवर्तन अटळ असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.जिंतूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार विजय भांबळे यांनी पुन्हा वर्चस्व राखण्याचा दावा केला आहे, तर प्रताप देशमुख यांनीही विजयाची खात्री दिली आहे. सेलूमध्ये माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी भाजपच ‘नंबर वन’ ठरण्याचा दावा केला आहे, तर खासदार संजय जाधव आणि माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर यांनी कॉंग्रेस आघाडी बहुमताने सेलू पालिकेत सत्ता परिवर्तन घडवून आणणार असल्याचे ठामपणे सांगितले आहे.गंगाखेडमध्ये माजी आमदार डॉ.मधुसूदन केंद्रे यांनी विजयाचा दावा केला असून, पूर्णेत शिवसेनेने विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
आकडेमोडीतून विजयाचा निर्धार
मतदान संपल्यापासूनच मागील काही दिवसांपासून उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आकडेमोड करत रात्रभर गणिते मांडली आहेत. बदली आहेत. कोणत्या केंद्रावर स्वतःला किती मते पडतील आणि विरोधकांना किती मते मिळतील. यातून विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे, तर ‘लक्ष्मी अस्त्र’ प्रभावी ठरले का, याचेही विश्लेषण सध्या गल्लीबोळात, चौकाचौकात, ठिकठिकाणी रंगतदारपणे सुरू आहे. स्वतःच्या जमेच्या बाजू आणि विरोधकांच्या कमकुवत बाबींवर चर्चा करत प्रत्येक जण आपल्या विजयाची खात्री देत आहे. परंतु वाढलेले मतदान सत्तापरिवर्तनासाठी आहे की सत्ता टिकवण्यासाठी, याचे नेमके चित्र रविवारी स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत सोशल ट्रेंड सुरुच राहणार आहेत. उमेदवारांचा जीव मात्र चांगलाचा टांगणीला लागला आहे.
मतमोजणीची जय्यत तयारी
परभणी : जिल्ह्यातील पूर्णा नगरपरिषदेच्या दोन आणि जिंतूरच्या एका जागेसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरात कलम १६३ लागू केले असून मोबाईल, ध्वनीक्षेपके आणि खासगी वाहनांना बंदी घातली आहे.तसेच, २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून जिल्ह्यातील गंगाखेड, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ आणि पूर्णा येथील निश्चित केलेल्या केंद्रांवर मतमोजणी प्रक्रिया पार पडेल. मतमोजणीच्या दिवशी सकाळी ६ वाजेपासून केंद्राच्या परिसरात कडक निर्बंध राहतील. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विनापरवाना व्यक्तींना या परिसरात प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.





