आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षक संतोष चिद्रवार यांची मागणी : मुख्यमंत्र्यांना निवेदन
परभणी : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ग्रामीण आणि दुर्गम भागातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक विषयांसोबतच कला, क्रीडा, संगीत आणि सांस्कृतिक उपक्रमांनाही समान महत्त्व देणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शाळांना आवश्यक संगीत वाद्यांचा संच उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषद प्रशाला, बोरी येथील माध्यमिक शिक्षक तथा महाराष्ट्र राज्य आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षक संतोषकुमार सूर्यकांतराव चिद्रवार यांनी १४ ऑगस्ट २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती पत्र निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हा परिषद शाळांमध्ये संगीत शिक्षकांची संख्या अत्यल्प असून, अनेक शाळांमध्ये आवश्यक संगीत वाद्ये उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना संगीत शिक्षण आणि नियमित सरावाची पुरेशी संधी मिळत नाही. शाळेच्या दैनंदिन परिपाठामध्ये राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत, वंदे मातरम् तसेच विविध देशभक्तीपर आणि सांस्कृतिक गीतांचे सामूहिक गायन केले जाते. मात्र बहुतांश शाळांमध्ये केवळ ड्रम उपलब्ध असल्याने या गीतांना प्रामुख्याने ड्रमचीच साथ द्यावी लागते. परिणामी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातील संगीताचा दर्जा आणि वैविध्य मर्यादित राहते.
जिल्हा परिषद शाळांना, विशेषतः माध्यमिक शाळांना हार्मोनियम, तबला, की-बोर्ड, ढोलकी, झांज, मंजीरा, बासरी आदी आवश्यक संगीत वाद्यांचा संच उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थ्यांना संगीताचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. त्यातून विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासोबतच त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग वाढण्यास मदत होईल.राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत, वंदे मातरम् तसेच राष्ट्रभक्तीपर गीतांचे सामूहिक आणि शिस्तबद्ध सादरीकरण करताना विविध वाद्यांची साथ मिळाल्यास विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा, सांघिक भावना आणि सांस्कृतिक जाणीव अधिक दृढ होण्यास मदत होईल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगीत आणि कलेच्या क्षेत्रात आपली गुणवत्ता दाखविण्यासाठी योग्य वातावरण निर्माण होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांचे सर्वेक्षण करून प्रत्येक शाळेच्या गरजेनुसार आवश्यक संगीत वाद्यांचा संच उपलब्ध करून द्यावा. तसेच उपलब्ध वाद्यांची देखभाल, दुरुस्ती आणि विद्यार्थ्यांना संगीताचे प्रशिक्षण मिळण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करावी, अशी मागणी चिद्रवार यांनी केली आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही शहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणे संगीत, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात समान संधी मिळावी, त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळावी, या व्यापक उद्देशाने शासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करावा, अशी अपेक्षा चिद्रवार यांनी व्यक्त केली आहे.





