वाशिम एलसीबीची धडक कारवाई, दहा बनावट ऑटोरिक्षांसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक
वाशिम (फुलचंद भगत) : एक ई-चलान मेसेज हिंगोली येथील एका रिक्षा चालकास त्याचे ऑटोवर चलान केल्याबाबत गेला. त्याने सदर मेसेजची शहानिशा केली असता सदर चलान वाशिम पोलिसांनी केले असल्याचे समजले परंतु ज्या ऑटोवर चलान झाले तो ऑटो वाशिमला कधी आलाच नाही.
सदर ऑटो मालकाने स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम येथे सदर घटनेबाबत माहिती दिली असता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांना सदर प्रकरणामध्ये चोरीचा संशय आल्याने त्यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले यांचे सह एक पथक तयार करून शहरात पडताळणी करीता पाठविले. सदर ऑटोचा शोध घेतला असता ऑटो हा दादाराव राजाराम घुगे वय ५२ वर्ष रा. शुक्रवार पेठ, वाशिम यांचा असल्याचे निष्पन्न झाले. स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने त्वरित सदर इसमाचा शोध घेवून त्यास ताब्यात घेतले सदर संशयित इसमास विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याचे जवळ १० ऑटो रिक्षा मिळून आले. सदर ऑटो रिक्षाची पाहणी केली असता तसेच नंबर प्लेट व चेचिस नंबर चेक केले असता सर्व बनावटी असल्याचे निष्पन्न झाले. तसेच सदर ऑटो खरेदी केल्याचे बनावटी कागदपत्र मिळून आले. यातील आरोपी हा एक ऑटो दरदिवसाला २५०/- रुपयाने भाडेने देत होता. वरून आरोपी नामे दादाराव राजाराम घुगे यास ताब्यात घेवून त्याचे कडून बनावट नंबर प्लेट व बनावट कागदपत्रे असलेले १० ऑटो रिक्षा किंमत ८,६०,०००/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून पोलीस स्टेशन वाशिम शहरच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपीवर अप क्र ८९९/२६ कलम ३१८(४), ३३६(२) भा. न्या. सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर बनावट नंबरप्लेट ऑटो रिक्षाचा सूत्रधार कोण आहे याबाबत सविस्तर तपास सुरु आहे.सदर कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाशिम रामकृष्ण पवार, पोलीस निरीक्षक सुधाकर आढे, स्थानिक गुन्हे शाखा वाशिम, यांचे नेतृत्वाखाली पोउपनि सचिन गोखले, पोहवा गजानन अवगळे, दिलीप देवकते, विनोद अवगळे, पोलीस अंमलदार विठ्ठल महाले, संदीप दुतोंडे, तुषार ठाकरे आणि चालक सुनील तायडे यांच्या पथकाने केली.





