मंगरुळपीर पोलिस ठाण्यात एसीबीचा सापळा; खासगी इसम ताब्यात, हेड कॉन्स्टेबल वाहनाने भरधाव फरार
फुलचंद भगत/वाशिम:-मंगरुळपीर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या दोषारोपपत्राची झेरॉक्स काढण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) वाशिम पथकाने गुरुवारी सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत पोलिस हेड कॉन्स्टेबल सुनील टाले याच्या वतीने दोन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या खासगी इसम विजय चंदू चव्हाण याला एसीबीने ताब्यात घेतले. दरम्यान, कारवाईसाठी गेलेल्या पथकाला पाहून हेड कॉन्स्टेबल टाले हा चारचाकी वाहनातून भरधाव वेगाने फरार झाल्याची माहिती एसीबीने दिली आहे.
एसीबीकडे ३ सप्टेंबर रोजी एका ५३ वर्षीय मजूर व्यक्तीने तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून मंगरुळपीर पोलिस ठाण्यात २५ जुलै २०२६ रोजी गुन्हा क्रमांक ५२७/२०२६ नुसार बीएनएसच्या कलम ११८(१), २९६, ३५१(२), ३५१(३) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल सुनील टाले यांच्याकडे होता.या गुन्ह्याचे दोषारोपपत्र पाठविण्याची प्रक्रिया सुरू असताना, त्याची झेरॉक्स काढण्यासाठी दोन हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. ही रक्कम खासगी इसम विजय चंदू चव्हाण याच्याकडे देण्यास सांगितल्याचेही तक्रारदाराने नमूद केले.
तक्रारीची पडताळणी एसीबीच्या पथकाने ३ सप्टेंबर रोजी दुपारी २.३२ ते ३ वाजेदरम्यान पंचांसमक्ष मंगरुळपीर पोलिस ठाण्यात केली. या पडताळणीमध्ये चार्जशीटची झेरॉक्स काढण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागण्यात आल्याचे आणि ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाल्याचे एसीबीने सांगितले.त्यानंतर दुपारी ३.२४ ते ३.४० वाजेदरम्यान सापळा रचण्यात आला. यावेळी सुनील टाले याने तक्रारदाराला दोन हजार रुपयांची लाच खासगी इसम विजय चव्हाण याच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार विजय चंदू चव्हाण याने सुनील टाले याच्या वतीने दोन हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे एसीबीच्या अहवालात नमूद आहे.
कारवाईदरम्यान हेड कॉन्स्टेबल वाहन घेऊन फरार
लाच स्वीकारल्यानंतर एसीबीचे पथक पोलिस हेड कॉन्स्टेबल सुनील टाले याला ताब्यात घेण्यासाठी गेले असता त्याने कायदेशीर अटकेस मज्जाव केला. त्यानंतर आपल्या ताब्यातील चारचाकी वाहनात बसून सापळा पथकाच्या दिशेने भरधाव वेगाने वाहन चालवत सार्वजनिक रस्त्यावरून बेदरकारपणे फरार झाल्याची माहिती एसीबीने दिली आहे. दरम्यान, खासगी इसम विजय चंदू चव्हाण याला पथकाने ताब्यात घेतले असून आरोपींच्या राहत्या घराची झडती घेण्याची कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी मंगरुळपीर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम ७ व ७(अ) सह बीएनएसच्या कलम २८१ व २६२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वाशिमच्या पोलिस निरीक्षक सुलभा राऊत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पोलिस हवालदार विनोद मार्कंडे, समाधान मोघाड व मो. मुंबशीर यांचा समावेश होता. कारवाईवर पोलिस उपअधीक्षक जगदीश परदेशी यांचे पर्यवेक्षण होते.अमरावती परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक बापू बांगर तसेच अपर पोलिस अधीक्षक सुनील किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरुद्ध तक्रार करण्याचे आवाहनभ्रष्टाचारासंबंधी माहिती अथवा कोणत्याही लोकसेवकाने लाच मागितल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे. अमरावती परिक्षेत्र कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०७२१-२५५३०५५ असून, एसीबी मुख्यालयाचा संपर्क क्रमांक ०२२-२४९२१२१२ आणि व्हॉट्सॲप क्रमांक १०६४ असा देण्यात आला आहे.





