परभणी डाएटचे वरिष्ठ अधिव्याख्याता गणेश शिंदे यांचे निर्देश, नियमित उपचारात्मक अध्यापनावर भर देण्याचे आवाहन
सेलू : सेलू तालुकास्तरीय शिक्षण परिषदेत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (डाएट) वरिष्ठ अधिव्याख्याता गणेश शिंदे यांनी डाएटमार्फत मराठी व गणित विषयांत घेतलेल्या सर्वेक्षणाचा विश्लेषणात्मक अहवाल सादर केला. यामध्ये खाजगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची दयनीय स्थिती त्यांनी निदर्शनास आणून दिली आणि तालुक्यांसह जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले.
सेलू येथील गटसाधन केंद्राच्या नवीन सभागृहात बुधवारी, २ सप्टेंबर २०२६ रोजी खाजगी अनुदानित प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांच्या (इयत्ता १ ली ते ८ वी) शिक्षकांसाठी शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती. परिषदेत श्री.शिंदे यांनी ‘परख अहवाल २०२४’ च्या आधारे इयत्ता ३ री व ६ वीच्या मराठी, गणित व विज्ञान विषयातील जिल्ह्याच्या कामगिरीचा वास्तववादी आढावा सर्वांसमोर मांडला.
पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (एफएलएन) सक्षमीकरणावर भर देत विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि तालुक्यासह जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी उपचारात्मक अध्यापन, नियमित मूल्यमापन तसेच मूलभूत क्षमतांचा विकास करण्याच्या ठोस उपाययोजना भर देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच शिक्षकांनी प्रत्यक्ष वर्गात कृतीयुक्त अध्ययन-अध्यापन पद्धतीचा अवलंब करावा आणि शासनाने उपलब्ध करून दिलेल्या भाषा व गणित विषयांच्या शैक्षणिक साहित्य पेट्यांचा (टीएलएम) नियमित व परिणामकारक वापर करावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सकाळच्या सत्रात केंद्रप्रमुख मोअज्जम शेख यांनी परख आणि पीजीआय या विषयांवर विश्लेषण करून शिक्षकांना मार्गदर्शन केले. शिक्षण परिषदेच्या संयोजिका सुनिता काळे यांच्यासह डाएटचे विषय सहाय्यक प्रसन्न भावसार, सुलभक माधव गव्हाणे व शरद ठाकर यांची प्रमुख उपस्थिती होती. समारोपप्रसंगी शैक्षणिक दर्जाउंचावण्यासाठी, अध्ययन त्रुटी दूर करून सेलू तालुका गुणवत्तापूर्ण बनवण्याचा निर्धार शिक्षकांनी व्यक्त केला.





