निष्काळजीपणा टाळा, काळजी घ्या : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे आवाहन
परभणी, दि.२६ : जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढत असून या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो. साध्या उपाययोजनांनीही मोठा धोका टाळता येतो, असे स्पष्ट करत त्यांनी नागरिकांना दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळण्याचा सल्ला दिला. दरम्यान, रविवारी २६ फेब्रुवारी रोजी दुपारी कमाल तापमान ४३.७ नोंदविले गेल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम विभागाने दिली आहे.
विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि आजारी व्यक्ती यांनी अधिक दक्ष राहणे आवश्यक आहे. शरीरातील पाण्याची कमतरता आणि उष्णतेचा ताण यामुळे उष्माघाताचा धोका वाढतो. चक्कर येणे, अशक्तपणा, डोकेदुखी, उलट्या, जास्त घाम येणे किंवा अचानक बेशुद्धी अशी लक्षणे दिसल्यास विलंब न करता तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत.
*आरोग्य यंत्रणेने सज्ज राहावे*–उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर सर्व आरोग्य केंद्रे, दवाखाने व रुग्णालयांनी पूर्ण तयारीत राहून उष्माघातग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक औषधांचा मुबलक साठा ठेवावा.उष्माघात व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कक्ष / बेड्स उपलब्ध ठेवावेत. 24×7 आपत्कालीन सेवा कार्यरत ठेवावी. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना उष्माघात उपचाराबाबत सज्ज ठेवावे. गंभीर रुग्णांना तात्काळ उच्चस्तरीय रुग्णालयात रेफर करावे. तसेच कूलिंग सुविधा तत्पर ठेवाव्यात. वैद्यकीय व समवैद्यकीय कर्मचाऱ्यांना उष्माघात ओळख, प्राथमिक उपचार व तत्काळ प्रतिसाद याबाबत प्रशिक्षण द्यावे. नागरिकांमध्ये उष्माघात प्रतिबंधासाठी जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी जिल्हा रुग्णालय तसेच सर्व उपजिल्हा व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.
*जनजागृती व स्थानिक प्रशासनाची भूमिका*- • ग्रामपंचायत, नगरपालिका यांनी सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची (प्याऊ) व्यवस्था करावी • बांधकाम, शेती व इतर मैदानी कामे सकाळी किंवा सायंकाळी करावीत • आशा, अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून घराघरात जनजागृती करावी.
*उष्माघाताची लक्षणे* – • शरीराचे तापमान वाढणे (40°C किंवा अधिक) • चक्कर येणे, डोकेदुखी • मळमळ, उलट्या • त्वचा गरम व कोरडी होणे • अशक्तपणा किंवा बेशुद्ध पडणे*प्राथमिक उपचार* – • बाधित व्यक्तीस त्वरित थंड व सावलीच्या ठिकाणी हलवावे • शरीरावर थंड पाण्याचे शेक/पट्ट्या ठेवाव्यात • कपडे सैल करावेत व पाणी/ORS द्यावे • तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करावे.
*उष्मालाट काळात घ्यावयाची काळजी
**काय करावे* :–तहान नसली तरी पुरेसे पाणी प्या. गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच द्रवपदार्थ घ्यावेत.ओआरएस, लिंबूपाणी, ताक, लस्सी, कैरीचे पन्हे, नारळपाणी यांसारखे द्रवपदार्थ घ्या. हलक्या रंगाचे, सैल व सुती कपडे परिधान करा. दुपारी १२ ते ३ या वेळेत बाहेर जाणे टाळा. बाहेर जाताना डोके झाका, टोपी/छत्री वापरा, गॉगल व सनस्क्रीनचा वापर करा. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्या. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवा. अशक्तपणा, चक्कर, डोकेदुखी जाणवल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्या. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर, सनशेडचा वापर करा. पशुधन सावलीत ठेवा व पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्या.
*काय टाळावे* :-दुपारी उन्हात बाहेर जाणे व कष्टाची कामे करणे टाळा. अनवाणी बाहेर जाऊ नका. अतिउष्णतेच्या काळात स्वयंपाक टाळा. मद्यपान, चहा, कॉफी, शीतपेये टाळा. जास्त तेलकट, तिखट, मिठाचे व शिळे अन्न खाऊ नका. वाहनात लहान मुले किंवा प्राणी बंद करून ठेवू नका. गडद व जाड कपडे परिधान करणे टाळा. तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रम टाळा. नागरिकांनी या सूचनांचे पालन करून स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
*घराचे छत थंड ठेवण्यासाठी उपाय :*कूल रूफ कोटिंग – छतावर पांढरा किंवा फिकट रंग लावा. त्यामुळे सूर्याची उष्णता परत जाते आणि घर ३–५°C ने थंड राहते.अॅक्रेलिक / एलास्टोमेरिक कोटिंग – हे कोटिंग लावल्याने उष्णता कमी होते.कूल टाईल्स – छतावर पांढऱ्या टाईल्स बसवल्यास उष्णता कमी आत येते.छतावर बाग / गवत – जिथे शक्य असेल तिथे छोटे रोप किंवा गवत लावल्यास नैसर्गिक थंडावा मिळतो.





