कीर्तनसेवेची १६५ वर्षांची परंपरा
परभणी : परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील वालूरकर दिंडीचे नेतृत्व करणारे पुरुषोत्तम महाराज वालूरकर यांचे मंगळवारी, ७ जुलै २०२६ रोजी श्री क्षेत्र आळंदी येथे माऊलींच्या मंदिरात मानाची कीर्तन सेवा पार पडली. मागील १६५ वर्षांपासूनची ही परंपरा आजही जपली जात आहे. याच परंपरेप्रमाणे रविवारी, १२ जुलै रोजी माउलींच्या पालखी समोर सासवड येथे वालूरकर महाराजांचे मानाचे कीर्तन होणार आहे.
मंगळवारी कीर्तन सेवेकरीता पुरूषोत्तम महाराजांनी जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचा ‘उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली ‘हा अभंग निवडला होता. अभंगाचे विवेचन करताना महाराज म्हणाले की, संतभेटीमुळे मनातील सर्व काळजी, दुःख, भीती आणि अस्वस्थता नाहीशी झाली. परमेश्वरावरील श्रद्धेमुळे शांती, समाधान व आनंद लाभला. परमेश्वराची कृपा झाल्यावर जीवन धन्य होते, नशीब उजळते व जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो. संतांच्या दर्शनामुळे परमात्मा भेट झाली म्हणून जी चिंता होती ती वारली अर्थात नष्ट झाली.
सेलू तालुक्यातील श्रीक्षेत्र वालूर येथील अण्णासाहेब महाराज व बापूसाहेब महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरीची आषाढवारीसाठी वालूरकर दिंडीची सुरुवात झाली होती. यावर्षी अण्णासाहेब महाराज यांच्या समाधीस्थानाहून ४ जुलै रोजी वालूरकर दिंडीने प्रस्थान ठेवले.पालखी सोहळ्यात माऊलींच्या रथामागे १५ क्रमांकाचा मान या दिंडीला आहे.





